संस्कृत साहित्यातील पंचमहाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यातील माघाचे शिशुपालवधम् आणि भारवीचे किरातार्जुनीयम् या दोन महाकाव्यांची माहिती आपण यापूर्वीच घेतली. आता आपण पाहणार आहोत, श्रीहर्षाचे ‘नैषधीयचरितम्’! पण तत्पूर्वी हा श्रीहर्ष कोण हे पाहू. संस्कृत ग्रंथकारांची सहसा त्यांच्या नावाशिवाय विश्वासार्ह माहिती उपलब्ध होत नाही. तथापि श्रीहर्षाने ‘नैषधीयचरितम्’ च्या प्रत्येक सर्गाच्या शेवटी स्वतःची संक्षिप्त माहिती दिलेली आढळते. त्यानुसार हर्षच्या वडिलांचे नाव श्रीहीर आणि आईचे नाव मामल्लदेवी असे होते. इ.स.बाराव्या शतकात होऊन गेलेल्या कान्यकुब्जचा राजा जयंतचंद्र यांचा राजाश्रय हर्षाला लाभला होता. ‘चिंतामणीमंत्र’ सिद्धी त्याला प्राप्त होती.
एका दंतकथेनुसार श्रीहर्षाचे वडील श्रीहीर हे काशीचा गढवालवंशीयराजा विजयचंद्राच्या दरबारात प्रमुख राजपंडित होते. ते चांगले कवी आणि दार्शनिक होते. एकदा एका विद्वानांच्या सभेत ते शास्त्रार्थ चर्चेत पराभूत झाले. त्याच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. परंतु मृत्यूपूर्वी आपल्या मुलाला जवळ बोलावून आपला पराभव करणाऱया उदयनाचार्यांना शास्त्रार्थात हरवून बदला घेण्याची इच्छा व्यक्त केली. ती अंतीम इच्छा पूर्ण करण्यासाठी हर्ष भगवती त्रिपुरादेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी चिंतामणी मंत्राचा जप करीत एक वर्षापर्यंत गंगातीरावर राहिला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवीने त्याला अपराजेय पांडित्याचे वरदान दिले.
वरदान मिळाल्यावर वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी श्रीहर्ष काशीला विजयचंद्राच्या दरबारात आला. त्याने उदयनाचार्यांना शास्त्रार्थाचे आव्हान दिले. ते काव्य वरवर पहाता राजा विजयचंद्राला उद्देशून होते. पण त्यात जागोजागी श्लेष अलंकार वापरल्यामुळे त्याचे दोन दोन अर्थ निघत होते. ते त्या कविंना न समजल्याने अर्थातच त्यांचा पराभव झाला आणि आपल्या वडिलांच्या पराभवाचे उट्टे हर्षाने आपल्या श्लष्टि काव्यशैलीच्या सामर्थ्यावर काढले!
श्रीहर्षाने अनेक ग्रंथ लिहीले. आपल्या प्रत्येक ग्रंथाचा उल्लेख त्याने ‘नैषधीयचरितम्’ च्या प्रत्येक सर्गाच्या अंतिम पद्यात केला आहे. महाभारताच्या मूळकथेनुसार रचना केलेल्या ‘नैषधीयचरितम्’ ह्या महाकाव्याचे बावीस सर्ग आणि 2830 श्लोक आहेत. महाकाव्याचे सारे मापदंड ह्यात पाळले गेलेत. तो कवीपेक्षा पंडित म्हणूनच अधिक श्रे÷ होता. संस्कृत भाषेतील अशी एकही शाखा नाही, जी हर्षाला माहित नव्हती. त्याने आपल्या काव्यात अनेक अलंकारांचा वापर केला. पण ‘श्लेष’ अलंकाराचा वापर आपल्या पांडित्याच्या जोरावर इतका केलाय की, त्यावरून त्याला ‘श्लेषवेडा कवी’ म्हटले जाते. शास्त्रात आणि काव्यात सारख्याच क्षमतेने संचार करणाऱया दुर्मिळ ग्रंथकारांमध्ये श्रीहर्ष श्रे÷ आहे.








