संपूर्ण कुटुंबाची बदनामी केल्याचा सिद्धेश नाईक यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
ऍड. आयरिश रॉड्रिगीश हे केंद्रीय आयुषमंत्री तथा केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री असलेल्या आपल्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबियांची बदनामी करत असल्याचा आरोप करत खोर्ली जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी पणजी पोलीस स्थानक आणि रायबंदर येथील सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने रायबंदर येथील जुन्या गोमेकॉ इमारतीत योग केंद्र आणि पारंपरिक औषधांसाठी सुविधा निर्माण करण्याची योजना आखली होती. सदर योजना दोन वर्षांपूर्वीची होती. मात्र ऍड. रॉड्रिगीश यांनी वैयक्तिक आकसापोटी तो विषय आता उकरून काढला असून फेसबूक आणि अन्य समाजमाध्यमांवरून ते आपले वडील केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची बदनामी करत असल्याचे सिद्धेश नाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे.
प्रसिद्धीचा स्टंट, बदनामीचे कारस्थान
रायबंदर येथील सदर योजना साकार झालीच पाहिजे हे आमचेही मत आहे. परंतु ऍड. रॉड्रिगीश यांनी तो विषय उकरून काढण्याची निवडलेली वेळ चुकीची आहे. आता काही महिन्यानंतर पालिका निवडणूक येणार असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांना या विषयाची आठवण होणे यातून त्यांच्या मनाचा कलुषितपणा दिसत आहे. लोकांच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज पसरविण्याच्या हेतुनेच हे सर्व जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आयरीश यांची ही कृती म्हणजे केवळ प्रसिद्धीचा स्टंट आणि बदनमीचे कारस्थान असून लोकांच्या विरोधात विनाकारण ओरड करुन स्वार्थ साधणे हा त्यांचा धंदा बनला आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.
आयरीश यांच्याकडून विनाकारण आपली बदनामी
त्याही पुढे जाताना आयरीश यांनी आपलेही नाव बदनाम केले आहे, केंद्रीय मंत्र्यांचा पुत्र असल्याचा फायदा घेत आपण आयुष मंत्रालयाच्या सर्व प्रकल्पांसाठी ब्रोकर म्हणून काम करत आहे, असे आरोप आयरीश केले असल्याचे सिद्धेश यांनी तक्रारीत नमूद केले आहे. हे आरोप आणि वक्तव्ये पूर्णपणे निराधार आहेत. आयुष मंत्रालयाच्या कोणत्याही कामकाजात आपण कधीच हस्तक्षेप केलेला नाही, असे सिद्धेश यांनी म्हटले आहे.
स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्व अशी माझ्या वडिलांची प्रतिमा आहे. ती डागाळण्याचे षडयंत्र आयरीश यांनी अवलंबले आहे. याऊलट आयरीश यांची ओळख खंडणी बहाद्दर अशी आहे. त्यामुळे आमच्याकडूनही खंडणी मिळावी या अपेक्षेने कदाचित ते आमची बदनामी करत असावे, असे सिद्धेश यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकाराची त्वरित दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या तक्रारीच्या पुराव्यादाखल त्यांनी समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या मजकुराच्या प्रतीही जोडल्या आहेत. तक्रारीची प्रत त्यांनी उत्तर गोवा उपविभागीय पोलीस अधिकाऱयांनाही सादर केली आहे.








