गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे श्रीपतराव बोंद्रे जन्मशताब्दी समारंभात गौरवोद्गार
प्रतिनिधी / वाकरे
श्रीपतराव बोंद्रे दादा हे विकासाभिमुख नेतृत्व होते, ग्रामीण भागात सहकाराचे जाळे विणून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचे काम त्यांनी केले, या विकासकामातून बोंद्रे दादांनी कोल्हापूर जिल्ह्यात विकासाचा भूगोल घडवला असे गौरवोद्गार राज्याचे गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. फुलेवाडी (ता. करवीर) येथे स्व.चंद्रकांत बोंद्रे यांच्या निवासस्थानी कोल्हापूर सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझूमर्स स्टोअर्सच्या वतीने दिवंगत कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या जन्मशताब्दी समारंभात गृह राज्यमंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभी कासारी कारखान्याच्या माजी संचालिका श्रीमती रमादेवी बोंद्रे होत्या.
आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी श्रीपतराव बोंद्रे दादांनी कोल्हापूर जिल्ह्याला दिशा देण्याची भूमिका घेतली, ते दूरदृष्टी असणारे नेते होते. के.एम.टी.बस सारख्या अनेक गोष्टींचे ते जनक होते. समाजोपयोगी कार्य करण्यासाठी जन्मास आलेल्या बोंद्रे दादांनी सर्वच क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजक कोल्हापूर कंजूमर्स स्टोअर्सचे चेअरमन अभिषेक सुभाष बोंद्रे यांनी श्रीपतराव बोंद्रे दादा यांनी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन उतुंग भरारी घेतल्याचे सांगितले. माजी जि. प. सदस्य बाबासाहेब देवकर यांनी श्रीपतराव बोंद्रे दादांनी कोल्हापूरच्या भूमीत काँग्रेस पक्ष रुजवण्याचे काम केल्याचे सांगितले. कुंभीचे माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील यांनी श्रीपतराव बोंद्रे दादांच्या आशीर्वादाने करवीर तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते बोंद्रे दादांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, स्मरणिका प्रकाशन आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पुणे शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचा रमादेवी बोंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील,माजी आमदार चंद्रदीप नरके,नगरसेवक राहुल माने, शारंगधर देशमुख, प्रतापसिंह जाधव,बिद्रीचे संचालक विजयसिंह मोरे, डॉ. उद्धव पाटील, विद्युत मंडळाचे सदस्य अभिजित भोसले, माणिक पाटील-चुयेकर,शशिकांत पाटील-चुयेकर, अभिषेक डोंगळे, कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक बाजीराव शेलार, सरपंच सदाशिव खाडे, माजी जि.प.सदस्य एस.आर. पाटील, अरुण निंबाळकर, अनिल निकम, प्रकाश निकम, अनिल बोडके यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, करवीर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. आभार सदाभाऊ शिर्के यांनी तर सूत्रसंचालन प्रा. दिनेश डांगे यांनी केले.
रमा बोंद्रेना गोकुळमध्ये संधी द्या
यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गोकुळच्या गत निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलमधून स्व.चंद्रकांत बोंद्रे निवडून आल्याने आगामी निवडणुकीत त्यांच्या श्रीमती रमादेवी बोंद्रे यांना गोकुळमध्ये संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
एप्रिल-मेमध्ये दादांच्या आठवणी जागवूया
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोरोनामुळे श्रीपतराव बोंद्रे दादांची जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणात घेता आली नाही, मात्र येत्या एप्रिल-मे मध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना निमंत्रित करून भव्य कार्यक्रमाद्वारे श्रीपतराव बोंद्रे दादांच्या आठवणी जागवूया, त्यासाठी सहकार्य करू अशी घोषणा केली.