श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमधील नौगाव सेक्टरमध्ये शुक्रवारी पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. संशयित दहशतवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. तसेच अन्य एक कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, सायंकाळपर्यंत संशयित सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले नव्हते. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरसह राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









