प्रतिनिधी / बेळगाव
श्रीनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 47 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे. सोमवारी 23 नोव्हेंबरच्या सकाळी 9.30 वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
चन्नम्मा सोसायटी-श्रीनगर येथील राजशेखर गौडाप्पा पाटील यांच्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. रविवारी राजशेखर व त्यांचे कुटुंबीय परगावी गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी परतले, त्यावेळी घरचा दरवाजा उघडा होता. यावरून चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आहे.
बेडरुममधील एक लॅपटॉप, 250 ग्रॅम चांदीचे दागिने, चांदीची लक्ष्मीमूर्ती, देवीच्या गळय़ातील 2 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र असा सुमारे 47 हजारांचा ऐवज लांबविला आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









