ऑनलाईन टीम / पुणे :
दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षी सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी परिधान केली जाते. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी देखील सोन्याची साडी परिधान केलेल्या देवीचे सुवर्णवस्त्रातील मनोहारी रुपाचे दर्शन भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने घेतले. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते, त्यामुळे या दिवसाला महत्व आहे.
यावेळी मंदिराचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, नगरसेवक प्रविण चोरबोले, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल आदी उपस्थित होते. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी आहे.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली आहे. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या साडीतील देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा मंदिर बंद असल्याने शेकडो भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने देवीचे दर्शन घेतले. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात आला.
श्री महालक्ष्मी मातेसमोर नवरात्र उत्सवात नऊ दिवस दररोज सुमारे 2000 ते 2500 फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच दररोज वेगवेगळ्या फळांच्या या नैवेद्याचा प्रसाद पुण्यातील विविध कोविड सेंटर्सना पाठविण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात झाला. यामाध्यमातून संपूर्ण उत्सवात सुमारे 20 हजार फळे कोविड सेंटर्समधील रुग्ण व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तसेच विविध प्रकारचे यज्ञ-याग, पीएमपी कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि कोरोना योद्ध्यांच्या हस्ते पूजन असे नानाविध कार्यक्रम देखील उत्सवात करण्यात आले. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन तसेच मंदिराची वेबसाईट, फेसबुक पेज व युट्यूब तसेच स्थानिक केबलवर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.