तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे, साथरोग नियंत्रण करण्यास आटकाव निर्माण करणे, हलगर्जीपणा करून रुग्णांचे जीवितास धोका निर्माण करणे अशा विविध कारनांमुळे महानगरपालिकेच्या कोविड कंट्रोल रूम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिश बोराडे यांनी आयुक्त यांचे प्राधिकृत अधिकारी म्हणून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता १८६० चे कलम २६९, १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे ५१ (ब) व साथरोग अधिनियम ३ नुसार रविवारी फिर्याद दाखल केली असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व महानगरपालिका रुग्णालये, शहरी नागरी आरोग्य केंद्र, फिव्हर ओपीडी, सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालये, शासकीय रुग्णालये, डिस्पेन्सरी/ओपीडी वैद्यकीय व्यावसायिक यांना आयुक्त पी. शिवशंकर यांनी ताप सदृश्य अथवा आय. एल. आय. चे रुग्ण आल्यास त्यांची स्वाब चाचणी घेणे, सदर रुग्णांची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास कळविणे बंधनकारक केले आहे. सदर आदेशाचा भंग केल्यास सदर वैद्यकीय व्यावसायिक यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि आय. पी. सी. चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. असे असतानाही शहरातील पाटील नगर, विजापूर रोड येथील एका महिलेस खोकला, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉ. वी. एस. स्वामी यांचे श्री क्लिनिक येथे २४ ऑक्टोबर २०२० रोजी तपासणी करिता गेल्या होत्या. सदर डॉक्टरांनी त्यांना औषधे दिली, सलाईन लावले. परंतु कोरोना चाचणीसाठी पाठविले नाही.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे कळविले नाही. सदर रुग्णाची रक्त तपासणी व सिटी स्कॅन करण्याची शिफारस केली. या तपासणीमध्ये रक्तातील पेशींचे प्रमाण कमी झालेले होते. रक्तातील साखर वाढली होती. असे असून देखील दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला नाही. सदर महिलेस २९/१०/२०२० रोजी श्वास घेण्याचा पुन्हा त्रास वाढला. ऑक्सिजनची पातळी खूपच कमी झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सदर महिलेचा कोविड अहवाल पॉजिटीव्ह आला आणि दुसरेच दिवशी ३०/१०/२०२० रोजी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामूळे शासकीय आदेशाचे उल्लंघन करणे, साथरोग नियंत्रण करण्यास आटकाव निर्माण करणे, हलगर्जीपणा करून रुग्णांचे जीवितास धोका निर्माण करणे अशा विविध कारनांमुळे श्री क्लिनिक व येथील डॉ. स्वामी वी. एस. यांच्यावर विजापूर नाका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.









