प्रतिनिधी / वास्को
हेडलॅण्ड-सडा मुरगांव येथील श्री ईस्वटी ब्राह्मण लक्ष्मी-नारायण देवालयाचा पुनःप्रतिष्ठापनेचा 21 वा वर्धापनदिन व 47 वा पालखी उत्सव दि. 12 ते 16 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. उत्सव काळात रोज सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत श्रीस अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद व नैवेद्य, सायंकाळी भजन, पालखी, आरती व तीर्थप्रसाद होईल.
आज शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी धार्मिक विधी, अभिषेक, दु. 3 वा. मुरगाव पोलीस स्थानक कर्मचाऱयांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, सायं. 5 वा. भजनाचा कार्यक्रम, तद्नंतर आरती, तीर्थप्रसाद, रात्री 8 वा. उदय शशिकांत मयेकर व आशिष दामोदर फटजीतर्फे ‘स्वररजनी’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम.
उद्या शनिवार दि. 13 रोजी वर्धापनदिनानिमित्त सकाळी महापर्वणीचा दिवस, अभिषेक, नवचंडी, स्वाहाकारासाठी यजमान श्री. व सौ. निकी चेतन रेडकर, तद्नंतर आरती, तीर्थप्रसाद व प्रसाद वितरण. यंदा कोविडचा प्रसार रोखण्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्ध करण्यात आला आहे. नवचंडी कार्यक्रमप्रसंगी पुजारी व देवालय कमिटी पदाधिकाऱयांना उपस्थित राहता येईल. दुपारनंतर भाविकांना सामाजिक अंतराचे पालन आणि मास्क व सॅनिटायझरचा वापर करून श्रीचे दर्शन घेता येईल. सायंकाळी 4 वा. भजन, 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुवासिनी महिलांसाठी ‘दीपोत्सव’ कार्यक्रम होईल. गर्दी टाळण्यासाठी सुवासिनी महिलांनी या वेळेत सोयीनुसार दीपोत्सव कार्यक्रमात भाग घ्यावा. कोविड महामारीमुळे यंदा हा बदल करण्यात आला आहे. रात्री 9 वा. श्री लक्ष्मी नारायण देवालयातर्फे इन्सुली सावंतवाडी येथील श्री माऊली दशावतारी नाटय़ मंडळातर्फे ‘दैवं योग’ दशावतारी पौराणिक नाटक होईल.
रविवार दि. 14 रोजी 47वा पालखी उत्सव, सकाळी धार्मिक विधी, अभिषेक, तीर्थप्रसाद, नैवेद्य, 7 वा. सुवासिनी महिलांसाठी ‘श्री’ची ओटी भरण्याचा कार्यक्रम मंदिरात सुरू होईल. रात्रभर श्रीची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू असेल.
सोमवार दि. 15 रोजी सकाळी धार्मिक विधी, 7 वाजल्यापासून श्रीची ओटी भरण्याचा कार्यक्रम, सायं. 4 वा. भजन, त्यानंतर पालखी मंदिरासमोरील मंडपात ठेवण्यात येईल व रात्री 8 वाजेपर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. तद्नंतर बॅण्ड वादनासह, दिंडीच्या गजरात ‘श्री’ची मंदिर प्रदक्षिणा होऊन आरती व तीथप्रसादाने उत्सवाचा सांगता होईल. यंदा कोविड महामारीमुळे ‘श्री’च्या पालखीची सडा भागातून होणारी मिरवणूक काढण्यात येणार नाही, याची भाविकांनी नोंद घ्यावी.
मंगळवार दि. 16 रोजी सायं. 6 वा. भजन, आरती, तीर्थप्रसाद, तद्नंतर श्री ईस्वटी ब्राह्मण देवतांच्या मुख्य नारळाची व श्री लक्ष्मी-नारायण देवतांच्या ओटीची पावणी होणार आहे. 8.30 वा. श्री ईस्वटी ब्राह्मण देवालय समितीतर्फे 14 वर्षे व त्यावरील स्पर्धकांसाठी मुरगांव तालुका मर्यादित कराओके हिंदी सिनेगीत गायन स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱया स्पर्धकांनी (9552545740) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.









