चिंतामण मोरेश्वर आपटे यांची ‘श्यामभट्ट आणि त्याचा शिष्य बटो’ ही कादंबरी 1893 साली प्रकाशित झाली होती. यातला नायक श्यामभट्ट जोशी आणि त्याचा शिष्य बटो छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांच्याकडून प्रशस्तीपत्र मिळवावे या हेतूने चिंचवडहून प्रवासाला निघतात आणि गावोगाव भविष्य, मुहूर्त वगैरे सांगत आणि ज्योतिषविषयक सल्ले देत उदरनिर्वाह करीत कूच करतात. श्यामभट्ट हा लबाड नाही. पण त्याचा फलज्योतिषावर प्रगाढ विश्वास आहे आणि कोणीही त्या शास्त्रावर केलेली टीका त्याला सहन होत नाही. मुहूर्त बघण्याचे त्याचे वेड अपरंपार आहे. प्रवासाला पहाटे निघताना तो आणि बटो दाराच्या आत उजवा पाय उचलून आकाशातील तारकांकडे टक लावून बघत उभे राहतात. आकाशातील ग्रह त्यांच्या हिशेबाने योग्य स्थळी आल्यावर दोघे उजवा पाय जमिनीवर टेकतात आणि चालायला सुरुवात करतात. वाटेत त्यांच्यावर छोटी मोठी संकटे येतात. शेवटी ते महाराजांपर्यंत पोचतात व त्यांच्यासमोर आपल्या ज्ञानाची महती वर्णन करतात. महाराजांना प्रथम हसू येते. ते श्यामभट्टाची समजूत काढण्याचा प्रयास करतात व शेवटी त्यांना रामदास स्वामींकडे धाडतात.
रामदास स्वामी त्यांना समजुतीचे बोल सांगायला सुरुवात केल्यावर श्यामभट्ट त्यांच्याशी उद्धटपणे वाद घालू लागतो. पण रामदास स्वामी त्यांच्याशी शांतपणे पुढील युक्तिवाद करतात, ‘श्रीरामाला कर्ताकरविता म्हणण्याचे टाकून शनी, गुरु, मंगळ इत्यादी ग्रहांना मोठेपणा देणे हे मूर्खपणाचे काम आहे. यहुदी, पारशी, हबशी, फिरंगी इत्यादी लोक फक्त देवावर विश्वास ठेवून कामे करतात. मुहूर्त पाहून लढाईला जात नाहीत. तरी ते लढाया जिंकतात व आपल्या देशावर राज्य करतात. ते ग्रहांची दाने करीत नाहीत. तरी त्यांच्यातील नवरा-बायको सुखाने नांदतात व संसार करतात… तू जुने ग्रंथ पाहशील तर तुला दिसून येईल की नवग्रह, राशी व नक्षत्रांची शुभाशुभ फले वैदिककाळी लोक मानीत नव्हते… ग्रहांचे योग, स्वप्ने आणि अपशकुन यांचे फळ केवळ काकतालीय ज्ञानाने घडते, म्हणून त्यावर विश्वास ठेवू नये. ईश्वर कर्ताकरविता आहे. म्हणून ग्रहांना खरे मानण्यापेक्षा देवाला खरे मानावे हे बरे आहे…’
शेवटी रामदास स्वामी श्यामभट्टाला दासबोधातले अवतरण सुनवतात, भूत भविष्य वर्तमान, ठाऊके आहे परिच्छिन्न, त्यासीच म्हणिजेले ज्ञान, परि ते ज्ञान नव्हे।। शेवटी श्यामभट्टाची समजूत तात्पुरती तरी पटते व तो घराकडे परततो. कथेचा शेवट पुढील वाक्मयांनी केला आहे. श्रींच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागू लागलो व उद्योगी झालो तर श्रीरामचंद्र अजूनही आपणास संसारसागरात सुखी करतील यात तीळमात्र संशय नाही.








