800 किमीवरील शत्रूला भेदण्याची क्षमता : ओडिशात चाचणी
बालासोर / वृत्तसंस्था
भारताने शनिवारी ‘शौर्य’ क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीचे यशस्वी प्रक्षेपण केले. जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओडिशाच्या बालासोर येथून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून 800 किलोमीटरपर्यंत निशाणा लावला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
बालासोर येथून बुधवारी भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्यापाठोपाठ आता शौर्यची चाचणीही यशस्वी झाल्याने शत्रूराष्ट्रांना एक धोक्याचा इशारा मिळाला आहे. शौर्य क्षेपणास्त्रामुळे सध्याची क्षेपणास्त्र व्यवस्था अधिक बळकट होईल. हे क्षेपणास्त्र संचलित करण्यास हलके आणि सोपे आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी स्पष्ट केले.









