हनुमाननगर परिसरासह काही वसाहतींमध्ये घरांसमोर शोभेची झाडे लावून सुशोभिकरण : रस्ता अरुंद बनल्याने वाहनधारकांना होतोय अडथळा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना ये-जा करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने रस्त्यांची रुंदी वाढविण्यात येते. नवीन वसाहत निर्माण करताना मोठय़ा रुंदीच्या रस्त्यांची तरतूद आराखडय़ात केली जाते. मात्र काही वसाहतींमध्ये घरांसमोर रस्त्याशेजारी शोभेची झाडे लावून सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद बनल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे.
बुडाकडून नवीन वसाहती निर्माण केल्या जातात. या वसाहती निर्माण करताना रस्त्याची रुंदी वाहनांच्या गर्दीनुसार तसेच नागरिकांच्या वर्दळीनुसार ठेवली जाते. तसेच रस्त्याचे महत्त्व किती आहे, यावर देखील रस्त्याची रुंदी ठरविली जाते. आतापर्यंत ठिकठिकाणी शहरीकरण कायद्यानुसारच रस्त्यांची निश्चिती करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांचे रुंदीकरण महापालिकेने केले आहे. मात्र आराखडय़ातील तरतुदीनुसार राखीव ठेवण्यात आलेल्या रस्त्यांवर बगीचा करण्याचा प्रकार सुरू आहे.
हनुमाननगर, लक्ष्मीटेकडी, टिळकवाडी, माळमारुती, महांतेशनगर, रामतीर्थनगर अशा विविध वसाहतींमध्ये घरांसमोरील रस्त्यांवर बगीचा बनविण्यात आल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. विशेषतः लक्ष्मीटेकडी येथील बुडा वसाहतीमध्ये घरासमोर विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. रुंदी जास्त असलेल्या रस्त्यावरील झाडांचा अडथळा वाहनधारकांना होत नाही. मात्र अरुंद रस्त्यावरील झाडे वाहनधारकांना अडचणींची ठरत आहेत.
हनुमाननगर परिसरातही शोभेची झाडे लावून सुशोभिकरण करणाऱयांची संख्या वाढली आहे. घरासमोरील अंगणात झाडे लावण्याबरोबरच रस्त्यावरदेखील बगीचा बनविण्यात येत आहे. वास्तविक पाहता जास्त रुंदी असलेल्या रस्त्यांशेजारी महापालिकेकडून शोभेची झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. अंतर्गत रस्त्यांवर झाडांचा अडथळा होण्याची शक्मयता असल्याने महापालिकेकडून झाडे लावण्यात आली नाहीत. मात्र काही पर्यावरणप्रेमींनी घरासमोरील रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी झाडे लावली आहेत.
महापालिकेने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज
हनुमाननगर योजना क्रमांक 13 येथील प्लॉट क्रमांक 360 ते 385 च्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली असून ही झाडे मोठी झाल्याने गटारी झाकोळल्या आहेत. कचरा काढताना स्वच्छता कर्मचाऱयांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच दोन्ही बाजूंनी झाडे असल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना अडचण निर्माण होत आहे. अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झाडे लावण्यात आल्याने सहा फुटाने रस्ता अरुंद बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण बनले आहे. निसर्गप्रेमींनी आपल्या जागेतच शोभेची झाडे लावल्यास रस्ता अरुंद होणार नाही. तसेच वाहनधारकांनादेखील अडथळा निर्माण होणार नाही. याबाबत लक्ष देऊन महापालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.









