इराणी करंडक सामना : यशस्वी जैस्वालचे शतक
वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
येथे सुरू असलेल्या पाच दिवसांच्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यातील शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी शेष भारत संघाने रणजी विजेत्या मध्यप्रदेशला निर्णायक विजयासाठी 437 धावांचे कठीण आव्हान दिले. मध्यप्रदेशने दिवसअखेर दुसऱ्या डावात 2 बाद 81 धावा जमवल्या. मध्यप्रदेशला रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी 356 धावांची जरुरी असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. शेवटच्या भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार शतक (144) झळकविले.
या सामन्यात शेष भारताने पहिल्या डावात 484 धावा जमवल्यानंतर मध्यप्रदेशने पहिल्या 294 धावा केल्याने शेष भारताने 190 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. शेष भारताने 1 बाद 85 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाला पुढे प्रारंभ केला. दरम्यान मध्यप्रदेशच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा दुसरा डाव 71.3 षटकात 246 धावात आटोपला. या सामन्यात पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकवणाऱ्या यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावातही शतक ठोकले. त्याने 157 चेंडूत 3 षटकार आणि 16 चौकारासह 144 धावा झळकवल्या. ईश्वरनने 1 षटकार आणि 2 चौकारासह 28, सेठने 1 षटकार आणि 5 चौकारासह 30, उपेंद्र यादवने 3 चौकारासह 13 तर नारंगने 1 चौकारासह नाबाद 15 धावा केल्या. मध्यप्रदेशतर्फे आवेश खान, अनिकेत कुशावह, सारांश जैन आणि शुभम शर्मा यांनी प्रत्येकी दोन तर कार्तिकेयने एक गडी बाद केला.
शेष भारताकडून मध्यप्रदेशला निर्णायक विजयासाठी 437 धावांचे आव्हान मिळाल्यानंतर मध्यप्रदेशने दुसऱ्या डावात 29 षटकात 2 बाद 81 धावा जमवल्या. कर्णधार मंत्री 78 चेंडूत 8 चौकारासह 51 तर गवळी 2 चौकारासह 15 धावावर खेळत आहेत. सलामीचा अकील खाते उघडण्यापूर्वीच पायचित झाला. शुभम शर्माने 1 चौकारासह 13 धावा जमवल्या. शेष भारतातर्फे मुकेशकुमार आणि सौरभकुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : शेष भारत प. डाव 121.3 षटकात सर्वबाद 484, मध्यप्रदेश प. डाव 112.5 षटकात सर्वबाद 294, शेष भारत दु. डाव 71.3 षटकात सर्वबाद 246 (जैस्वाल 144, सेठ 30, ईश्वरन 28, नारंग नाबाद 15, आवेश खान, कुशावह, जैन, शर्मा प्रत्येकी दोन बळी तर कार्तिकेय एक बळी), मध्यप्रदेश दु. डाव 29 षटकात 2 बाद 81 (मंत्री खेळत आहे 51, गवळी खेळत आहे 15, अकील 0, शुभम शर्मा 13, मुकेशकुमार आणि सौरभकुमार प्रत्येकी एक बळी).









