भारताला 157 धावांची गरज, इंग्लंडच्या रूटचे शतक, बुमराहचे 5 बळी
वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत तरी खेळ सुरू होऊ शकला नव्हता. भारताला हा सामना जिंकण्यासाठी अद्याप 157 धावांची जरूरी असून 9 गडी बाकी आहेत.
इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने पहिल्या डावात 278 धावा जमवित पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकामुळे दुसऱया डावात सर्व बाद 303 धावा जमवित भारताला 209 धावांचे विजयाचे आव्हान दिले. चौथ्या दिवशीअखेर भारताने दुसऱया डावात 14 षटकांत 1 बाद 52 धावा जमवित विजयाच्या दिशेने आगेकूच केली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी शेवटच्या दिवशी नियोजित वेळेत खेळ सुरू होऊ शकला नव्हता. उर्वरित दोन सत्रात किती षटकांचा खेळ होऊ शकतो, हे पहावे लागणार आहे. चौथ्या दिवशी रोहित शर्मा व पुजारा दोघेही 12 धावांवर नाबाद राहिले होते. पहिल्या डावात 84 धावांची शानदार खेळी कणारा केएल राहुल 26 धावा काढून बाद झाला होता.
इंग्लंडने दुसऱया डावात पहिल्या डावाच्या तुलनेत सुधारित प्रदर्शन केले. रूटने इतरांच्या साथीने इंग्लंडला सुस्थिती प्राप्त करून देताना 109 धावांची शतकी खेळी केली. त्याने 172 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 21 वे शतक नोंदवले. बुमराहने भेदक मारा करीत इंग्लंडचे शेपूट झटपट गुंडाळून त्यांचा डाव 85.5 षटकांत संपुष्टात आणला. रूटने काहीसा स्वैर मारा करणाऱया भारतीय गोलंदाजांवर प्रतिआक्रमणाचे धोरण ठेवले आणि तब्बल 14 चौकार वसूल केले. बुमराहने त्याची खेळी संपुष्टात आणताना पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याची शतकी खेळी वगळता अन्य काही फलंदाजांनी चांगली सुरुवात करूनही त्याचे त्यांना मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नाही. सिबलीने 28, बेअरस्टोने 30, सॅम करनने 32, लॉरेन्सने 25 धावा जमविल्या. बर्न्स, बटलर, ऑली रॉबिन्सन यांना मात्र विशी पार करता आली नाही. या सामन्यात बुमराहला सूर गवसला असून पहिल्या डावात 4 बळी टिपल्यानंतर दुसऱया डावात त्यांने इंग्लंडचे 64 धावांत 5 गडी बाद केले. मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी 2 तर शमीने एक बळी मिळविला.
दुसऱया डावात भारताने सावध प्रारंभ केला. पण रोहितपेक्षा राहुलने जास्त सफाईदारपणे खेळत 38 चेंडूतच 26 धावा काढल्या. ब्रॉडने बटलरकरवी झेलबाद करीत त्याच्या खेळीला ब्रेक लावला. नेहमीच शीटअँकरची भूमिका बजावणारा चेतेश्वर पुजारा यावेळी फटकेबाजी करताना दिसला. त्याने 13 चेंडूतच 3 चौकारांसह नाबाद 12 धावा जमविल्या असून रोहितने तितक्याच धावा करण्यासाठी 34 चेंडू घेतले. त्याच्या खेळीत एकाही चौकाराचा समावेश नव्हता.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड प.डाव 183, भारत प.डाव 278, इंग्लंड दु.डाव सर्व बाद 303 ः रूट 109, सॅम करन 32, बेअरस्टो 30, सिबली 28, लॉरेन्स 25, अवांतर 23. बुमराह 5-64, सिराज 2-84, ठाकुर 2-37, शमी 1-39. भारत दु.डाव 14 षटकांत 1 बाद 52 ः केएल राहुल 26, रोहित व पुजारा खेळत आहेत प्रत्येकी 12, ब्रॉड 1-18.









