हिमाचल प्रदेशातील छितकुल हे गाव भारताचे उत्तर सीमेवरील शेवटचे गाव मानले जाते. अत्यंत दुर्गम ठिकाणी असलेल्या या कमी वस्तीच्या गावातील सामाजिक नियम हे देशाच्या इतर भागातील नियमांपेक्षा काही वेगळेच आहेत. येथे एक महिला चार पुरुषांबरोबर विवाह करू शकते आणि हे पुरुष एकमेकांचे सख्खे भाऊ असतात. या गावात केवळ 471 मतदार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले आहे. या निवडणुकीमध्ये या गावाची माहिती देशभर चर्चेचा विषय बनली आहे. या गावात भारताच्या उत्तर सीमेवरील शेवटचा बसस्टँड, शेवटची शाळा, शेवटचे पोस्ट ऑफिस आणि शेवटचा ढाबा अशा अनेक ‘शेवटच्या बाबी’ आहेत. भारत आणि तिबेट यांच्या सीमेलगत या गावाचे स्थान आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी बरेच लोक हस्तकौशल्याच्या माध्यमातून अनेक वस्तू तयार करून त्या आसपासच्या शहरांमध्ये विकण्याचा व्यवसायही करतात. या गावात एक अनोखी प्रथा असून त्यानुसार गावदेवीच्या पूजनासाठी महिलेला दोन किंवा अधिक पुरुषांशी विवाह करण्याची मुभा आहे. पित्याच्या संपत्तीत मुलीला वाटा दिला जात नाही. तसेच बाहेरगावच्या लोकांची सावली खाण्याच्या वस्तूंवर अगर अन्नावर पडल्यास त्या वस्तू किंवा अन्न फेकून दिले जाते. बाहेरच्या लोकांची सावली पडल्यास अन्न दूषित होते, अशी या लोकांची समजूत आहे. हे गाव निसर्गसौंदर्याने फुललेले आहे. तथापि, अनेक विचित्र नियम येथील लोक कटाक्षाने पाळत असल्यामुळे पर्यटन क्षेत्र म्हणून या गावचा विकास होऊ शकलेला नाही. पूर्वी या गावातील लोक तिबेटला लागून असणारी सीमा ओलांडून तेथेही जात असत. तथापि, 1962 च्या चीन-भारत युद्धानंतर त्यांचा तिबेटशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या गावातील संस्कृती, राहणीमान, खानपान आणि अनेक स्थानिक कायदे हे देशाच्या अन्य भागातील अशाच बाबींपेक्षा पूर्णतः भिन्न आहेत, असे येथील ग्राम व्यवस्थापकही सांगतात. एका महिलेने चार पुरुषांची विवाह करण्याची परंपरा कशी निर्माण झाली, याचे कारणही गावकरी देतात. या प्रथेची मुळे थेट महाभारतापर्यंत गेलेली आहेत. महाभारतात द्रौपदीचे पाच पती म्हणजे पाच पांडव असल्याची कथा आहे. हीच परंपरा या गावातील महिला द्रौपदीच्या नि÷sने पाळतात, अशी माहिती देण्यात आली आहे. विवाहानंतर समागमाच्या वेळी जो पती पत्नीबरोबर असतो तो आपली टोपी खोलीबाहेर काढून ठेवतो. त्या टोपीवरून कोणता पती आत आहे, हे घरातील इतर नातेवाईक ओळखतात, असेही सांगण्यात आले आहे. एक पती आत असताना अन्य पतींना खोलीत जाता येत नाही, असाही नियम आहे.
Previous Articleकडोली येथे धनगर समाजातर्फे कनकदास जयंती साजरी
Next Article वडील धडधाकट, पोलिसांचेच कपट!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









