चेन्नई सुपरकिंग्सचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर शेन वॅटसनने आपण ‘सर्व क्रिकेट प्रकारा’तून निवृत्त होत असल्याचे आपल्या प्रँचायझीला कळवले. रविवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध शेवटच्या लढतीनंतर त्याने याबाबत प्रँचायझींशी संपर्क साधला. वॅटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्त झाला आहे. चेन्नईने त्याला 2018 मध्ये संपन्न झालेल्या लिलावात त्याला करारबद्ध केले होते. 2018 मध्येच चेन्नईने तिसरे जेतेपद संपादन केले, त्यात वॅटसनने सिंहाचा वाटा उचलला होता. 2008 मधील पहिले विजेते राजस्थान रॉयल्स संघातही त्याचा सहभाग राहिला.
‘आपण आयपीएलमध्ये यापुढे खेळणार नाही, असे सांगत असताना वॅटसन खूपच भावूक झाला होता. आपल्यावर जो विश्वास दर्शवला, त्याबद्दल त्याने चेन्नई प्रँचायझीचे आभार मानले आहेत’, असे एका सूत्राने नमूद केले. चेन्नईकडून खेळण्यापूर्वी वॅटसनने राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) या संघांचे प्रतिनिधीत्व केले होते. 39 वर्षीय शेन वॅटसनने 59 कसोटी, 190 वनडे व 58 टी-20 सामने खेळले असून आयपीएलमध्ये त्याने 145 आयपीएल सामन्यात सहभाग घेतला. यापैकी 43 सामने त्याने चेन्नईतर्फे खेळले.
यंदाच्या हंगामात वॅटसनला फारसा सूर सापडला नाही. पण, त्याने काही सामन्यात उत्तम खेळ साकारला. पहिल्या टप्प्यातील किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध लढतीत त्याने 83 धावांची आतषबाजी केली. जागतिक स्तरावरील या अव्वल खेळाडूने 2018 फायनलमध्ये शतक झळकावले, तसेच 2019 मध्येही त्याने दमदार खेळी साकारली होती. या आवृत्तीत चेन्नईला केवळ एका धावेने पराभव स्वीकारावा लागला होता.
वॅटसनचा धोनीशी उत्तम स्नेह आहे. त्यामुळे, आता वॅटसनने खेळातून निवृत्ती स्वीकारली असली तरी 2021 हंगामात संघाची नव्याने जडणघडण करताना वॅटसनला संघाच्या साहायक पथकात घेतले गेले तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. वास्तविक, आरसीबीतर्फे काही हंगामात वॅटसन अतिशय निष्प्रभ ठरला होता. पण, यानंतरही धोनीने त्याच्यावर बराच विश्वास दर्शवला आणि वॅटसनची चेन्नई संघात वर्णी लागली होती.









