प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर पोलिसांनी शेती पंप व दुचाकी चोरी करणाऱ्या युवकास एमआयडीसी परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून 80 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून अनिकेत दीपक वाघमारे (वय 18, रा. वरुड, ता. खटाव) असे त्या संशयिताचे नाव आहे.
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना एमआयडीसी परिसरात काही युवक चोरीचा माल विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी लगेच डीबी पथकास त्या युवकांचा शोध घेवून ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. डीबी पथक हे गस्त घालत असताना दोन युवक संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. त्या युवकांना पोलीस पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने ते दुचाकीवरुन पळून जात असताना डीबीच्या पथकाने पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पांढऱया बारदानात शेती पंप आढळून आला. त्याबाबत चौकशी केली असता तो वरुड येथून चोरुन आणल्याचे सांगितले. पोलिसांनी शेतीपंपासह दुचाकीही हस्तगत केली आहे.