होनगा येथील शेतवडीत घडली घटना : काकती पोलिसात नोंद
प्रतिनिधी / बेळगाव
शेतातील कामे आटोपून शेजाऱयांच्या शेतात असलेल्या शेततळय़ात हातपाय धुताना पाण्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत होनगा ता. बेळगाव येथे ही घटना घडली.
गंगाराम लक्ष्मण काकतीकर (वय 32) रा. होनगा असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गंगारामचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे गंगाराम हा रविवारी सकाळी शेतात गेला होता. आपली सहा वर्षांची पुतणी अनुश्री हिलाही सोबत घेऊन गेला होता. शेतातील कामे आटोपून गंगाराम हातपाय धुवून घेण्यासाठी शेजाऱयांच्या शेततळय़ात उतरला. यावेळी तोल जाऊन पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱया अनुश्रीने रडतच मुख्य रस्ता गाठला. मुलगी रडत असल्याचे पाहून एका दुचाकीस्वाराने का रडतेस? अशी तिच्याकडे विचारणा केली. अखेर त्या मुलीने सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.









