सोलापूर / प्रतिनिधी
शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावाच्या शिवारात ही घटना घडली. या घटनेने मार्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सानिका विजय गरड (सोनार) (वय 18), पूजा विजय गरड (सोनार) (वय 13) व आकांक्षा युवराज वडजे (वय 11) अशी मृत्यू पावलेल्या मुलींची नावे आहेत. मार्डी गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतात शेततळे आहे. त्याच परिसरातील शेतात सरपण म्हणून तुरीचे खोडके गोळा करण्यासाठी सर्व मुली गेल्या होत्या. त्यांनी खोडकांची एक खेपही केली होती. दुसऱया खेपेवेळी तहान लागल्याने यातील एक मुलगी ग्लास घेऊन शेततळ्यात पाणी घेण्यासाठी उतरली होती. पाणी घेत असताना तिचा पाय तळ्यातील प्लास्टिक कागदावरून घसरला. तिला वाचविण्याचा प्रयत्न इतर दोन मुलींनी केला. परंतु त्या दोघीही पाण्यात पडल्या. एकमेकीला वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न असफल ठरला. तिघीही पाण्यात बुडत होत्या. त्यावेळी आकांक्षाची आई कविता त्याच भागात सरपण गोळा करीत होती. तिने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दोरीच्या मदतीने तिने मुलींना बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु तिच्या प्रयत्नाला यश आले नाही. दरम्यान, तीनही मुली तळ्यात बुडून मृत पावल्या. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. लोक शेततळ्याच्या परिसरात जमा झाले. याबाबत तालुका पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात त्यांचे मृतदेह ताब्यात देण्यात आले. या घटनेने मार्डी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर तपास करीत आहेत.
आकांक्षाची बहीण विशाखा ही त्याच परिसरात हरभरे खात होती. यामुळे ती पाणी पिण्यासाठी तिघींबरोबर गेली नाही. तिघींना पाण्यात बुडाल्याचे पाहून तिनेच आई कविताला ही माहिती दिली. हरभरा खाण्यामुळे विशाखाने शेततळ्याकडे जाणे टाळल्याने तिचे प्राण वाचल्याची चर्चा परिसरात होती.