9.5 कोटी लाभार्थी 20,667 हजार कोटी रक्कम हस्तांतरित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 2,000 रुपयांचा आठवा हप्ता शुक्रवारी शेतकऱयांच्या खात्यात जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेला चालना दिली असून त्याचा लाभ देशभरातील 9 कोटी 50 लाख 67 हजार 601 इतक्या लाभार्थींना मिळाला आहे. केंद्र सरकारतर्फे तातडीने पात्र शेतकऱयांच्या खात्यात 20,667 हजार कोटी रुपये इतकी रक्कम हस्तांतरित केली. पश्चिम बंगालमधील शेतकऱयांना मागील हप्त्यातील रक्कमही या निधीसोबत वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधानांनी व्हिडीओ-कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान-किसान सन्मान निधीची रक्कम जाहीर केली आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर हेही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी गुरुवारीच ट्विट करत ‘देशातील कोटय़वधी शेतकऱयांसाठी शुक्रवारचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता जाहीर करण्याचा बहुमान मिळणार आहे. या निमित्ताने मी माझ्या शेतकरी बांधवांशीही संवाद साधेन’ असे जाहीर केले होते. या योजनेत शेतकरी कुटुंबांस वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीमार्फत जमा केली जाते.
अदृश्य शत्रूसोबत युद्ध…
शेतकऱयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी कोरोनाविषयक स्थितीवर भाष्य केले. देश सध्या अदृश्य शत्रूचा सामना करत आहे. कोरोनाविरुद्ध युद्धपातळीवर लढाई सुरू आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांनीही मास्क घालण्यासह इतर प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
काळाबाजार करणाऱयांवर राज्यांनी कारवाई करावी!
मागील काही काळात देशवासीयांनी ज्या वेदना सोसल्या त्या मलासुद्धा जाणवत आहेत. 100 वर्षांनंतर आलेली ही भयंकर महामारी प्रत्येक पावलावर जगाची परीक्षा घेत आहे. आपण आपल्या बऱयाच जवळच्या लोकांना गमावले असल्याचे सांगत या संकटप्रसंगी, काही लोक औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार स्वार्थापोटी करत आहेत. अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मी राज्य सरकारांना विनंती करतो, असेही ते म्हणाले.
लस घ्या, नियमही पाळा!
भारत अजूनही हिंमत हरलेला नाही अशी घोषणा करत देशभरातील सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जात आहे. त्यामुळे लस अवश्य घ्या. ही लस आपल्याला कोरोनाविरुद्ध संरक्षण देईल. तसेच मास्क आणि सुरक्षित अंतर हा मंत्र कोणीही सोडू नये, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. तसेच आजारी असलेल्यांनी वैद्यकीय मदत घेण्यास उशीर करू नये. लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधा, असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.









