प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजावर आता पिकविलेल्या कडधान्ये आणि भाजीपाल्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने आणखीनच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आणि शेतकरी संघटनेचे देवीदास चव्हाण-पाटील यांच्या शेतातील सुमारे 90 टन कोबी योग्य हमीभाव नसल्याने तसाच ठेवण्यात आला आहे. सरकारने योग्य हमीभाव देऊन याची खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान रविवारी भाजप नेते किरण जाधव यांनी शेतशिवारात जाऊन पाहणी केली. तसेच कोबीसह अन्य पिकांना सरकारकडून योग्य हमीभाव देऊन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. मनोहर हलगेकर यांच्या दीड एकर जमिनीत 30 ते 40 टन तर देवीदास चव्हाण-पाटील यांच्या दोन एकर जमिनीत 40 ते 50 टन कोबी लावण्यात आली आहे. मात्र, सध्या योग्य हमीभाव आणि बाजारात विक्री होत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. काही दिवसापूर्वीच राज्य सरकारवतीने योग्य हमीभाव देऊन कडधान्ये आणि भाजीपाला खरेदी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आशेवरच शेतकरी असून सरकारने या आश्वासनाची तात्काळ पूर्तता करावी आणि बळीराजाला या संकटातून पार करावे, अशी मागणी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी केली आहे. याप्रसंगी बाळू जोशी, आप्पाजी हलगेकर, पांडुरंग बाळेकुंद्री, राजू पाटील आदी उपस्थित होते. काही दिवसापूर्वीच मनोहर हलगेकर यांच्या गवत गंजीला आग लागून लाखाचे नुकसान झाले होते.









