प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी-भटवाडी येथील प्राणीमित्र स्वप्नील वामन सावंत व दिवाकर वामन सावंत या दोघांनीही घराच्या जवळ सापडलेल्या जखमी शेकरुवर उपचार करून जीवदान दिले. या दोघांनीही सतत चार दिवस या पिल्लावर उपचार केले. त्यानंतर घराच्या समोरच झाडाच्या मुळाशी त्या पिल्लाला दोघांनीही ठेवले. पिल्लाची चाहूल लागताच पिल्लाची आई खाली येत तिला आधार देत झाडावर घेऊन गेली. प्राण्यांचे मातृप्रेम पाहून दृष्य पाहणारे सारेच अचंबित झाले. प्राणीमित्र स्वप्नील सावंत हे मडगाव-गोवा येथे पार्ले कंपनीत व्यवस्थापक पदावर असून यापूर्वीही या दोघांनी मगरीचे पिल्लू, दोन डुकराचे पिल्लू, मोर, घुबडे आदींना जीवदान दिले आहे.









