सेन्सेक्समध्ये 889 अंकांची घट : इंडसइंड बँक तोटय़ात
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने मोठी घसरण अनुभवली आणि गुंतवणूकदारांची पार निराशा झाली. यात इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक घसरलेले पाहायला मिळाले. बाजार भांडवलातही 4.55 लाख कोटी रुपयांची घट झाली असल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 889 अंकाच्या घसरणीसह 57,011.74 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 263 अंकांच्या घसरणीसह 16,985.20 अंकांवर बंद झाला. इंडसइंड बँकेचा समभाग सर्वाधिक 4.71 टक्के इतका घसरला होता. गुरूवारी बाजार भांडवल मूल्य 264.02 लाख कोटी होते, जे शुक्रवारी 259.47 लाख कोटीवर घसरले आहे.
ओमिक्रॉनचे वाढते रुग्ण, विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा या कारणास्तव शुक्रवारी बाजार घसरणीत होता. गेल्या 40 दिवसात विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 80 हजार कोटी रुपये काढले आहेत. सकाळी सेन्सेक्स 120 अंकांनी वधारत 58,021 अंकांवर खुला झाला होता. पण नंतर मात्र बाजाराने नकारात्मक प्रवास सुरू ठेवला. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग घसरणीत राहिले आहेत. घसरणीत प्रमुख समभागांपैकी 14 समभाग 2 ते 4 टक्के इतके घटलेले दिसले. यात मारुती, महिंद्रा आणि महिंद्रा, रिलायन्स, एअरटेल, कोटक बँक, बजाज ऑटो, ऍक्सिस बँक आणि बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश आहे. तेजी राखणाऱया समभागांमध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, सन फार्मा आणि टीसीएस यांचा समावेश होता. निफ्टी निर्देशांकात 50 पैकी केवळ 5 कंपन्यांचे समभाग तेजी राखून होते. 45 समभाग मात्र घसरणीसह बंद झाले होते. वित्त सेवा आणि बँकिंग निर्देशांक अडीच टक्के घसरले होते. टायटन, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक यांचे समभाग 4 टक्के इतके घसरले होते.









