मडगाव पालिकेकडून मात्र पुरेसा साठा असल्याचे कारण देऊन साहित्य स्वीकारण्यास नकार ः कुतिन्हो
प्रतिनिधी / मडगाव
‘शॅडो कौन्सिल फॉर मडगाव’ने एकूण 650 मास्क आणि 2000 हातमोजे वेगवेगळय़ा यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत. मात्र मडगाव पालिकेने त्यांचे अनेक कामगार मास्कविना काम करत असल्याचे पाहायला मिळत असतानाही पुरेशी सामग्री असल्याचा दावा करून हे साहित्य स्वीकारण्यास ऐनवेळी नकार दिल्याचे शॅडो कौन्सिलने म्हटले आहे.
ईएसआय इस्पितळाला 200 मास्क आणि 1000 हातमोजे, हॉस्पिसियोला 200 मास्क आणि 600 हातमोजे, मडगाव अग्निशामक दलाला 50 मास्क आणि 100 हातमोजे, मडगाव शहर पोलीस स्थानक, मायणा-कुडतरी पोलीस स्थानक, वाहतूक पोलीस आणि महिला पोलीस स्थानक यांना मिळून एकूण 200 मास्क आणि 300 हातमोजे वितरित करण्यात आल्याची माहिती शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी दिली आहे.
पुरेसा साठा असल्याचे सांगून नगराध्यक्षांकडून नकार
नमडगाव पालिकेच्या नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी या दोघांनीही हे साहित्य स्वीकारण्यास आधी सहमती दर्शविली होती. परंतु प्रत्यक्षात वितरणाची वेळ आली तेव्हा नगराध्यक्षांनी केबिनमधून बाहेर येऊन पालिकेकडे आधीच मास्क व हातमोज्यांचा 20 हजार इतका साठा असल्याने या साहित्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले, असा दावा कुतिन्हो यांनी केला आहे.
योगायोगाने त्यानंतर लगेच पालिका इमारतीच्या खाली असलेल्या एका पर्यवेक्षकाची भेट झाली असता त्याने मास्क परिधान केलेला नसल्याचे दिसून आले. याविषयी विचारले असता मास्क दिल्यास आपण तो निश्चित घातला असता, असे उत्तर त्याने दिले. पालिकेकडे पुरेसा साठा असल्याचे सांगून शॅडो कौन्सिलने देऊ केलेले मास्क व हातमोजे स्वीकारण्यास नगराध्यक्षांनी नकार दिलेला आहे याकडे त्याचे लक्ष वेधण्यात आले तेव्हा, सदर साठा नेमका कुठे पोहोचला ते त्यांनी घोषित करायला हवे, अशी संतप्त प्रतिक्रिया सदर कर्मचाऱयाने दिली, असा दावा कुतिन्हो यांनी केला आहे. आम्हाला पालिकेच्या वर्तनाबद्दल जराही खेद नसून जेव्हा गरज पडेल तेव्हा मदत करण्यास शॅडो कौन्सिल तयार असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
वरील साहित्याचे वितरण केलेल्या शॅडो कौन्सिलच्या पथकात सावियो कुतिन्हो, आवदा व्हिएगस, आसिफ शेख, गौतम वेर्लेकर, आगुस्तीनो गामा आणि एडवर्ड लॉरेन्स यांचा समावेश राहिला. ईएसआय इस्पितळाचे डॉ. विश्वजित फळदेसाई, हॉस्पिसिओच्या डॉ. इरा आल्मेदा, पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर, सागर एकोस्कर आणि सूरज सामंत यांनी या कठीण काळात शॅडो कौन्सिल करत असलेल्या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढून सदर साहित्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.









