जामीन मिळाल्यानंतर कारागृहातून बाहेर
प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या अवमान घटनेच्या निषेधार्थ धर्मवीर संभाजी चौक येथे सभा घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शुभम शेळके, अंकुश केसरकर यांच्यासह 61 जणांवर राजद्रोह गुन्हा दाखल केला. याप्रकरणी 38 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामधील सर्वांनाच जामीन मिळाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर या दोघांची सुटका झाली आहे. इतर तरुणांचीही सुटका लवकरच होणार आहे.
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण सीमाभागामध्ये संतापाची लाट उसळली. बेळगावमधील शिवभक्तांनीही त्याचा निषेध नोंदविला. धर्मवीर संभाजी चौक येथे सभा घेतली आणि बेंगळूर येथील त्या घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर दगडफेक केली म्हणून या सर्व शिवभक्तांवर 307 आणि राजद्रोह असे गुन्हे दाखल केले. शिवभक्तांना नाहक त्रास देण्यासाठी पोलिसांनी असे कठीण गुन्हे दाखले केले.
मार्केट पोलीस स्थानक, खडेबाजार पोलीस स्थानक आणि कॅम्प पोलीस स्थानकामध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मार्केट पोलीस स्थानकामध्ये राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर या सर्वांनी धारवाड येथील उच्च न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्याठिकाणी विविध अटींवर जामीन मंजूर करण्यात आला. याचबरोबर येथील जिल्हा सत्र न्यायालय आणि जेएमएफसी न्यायालयामध्ये जामीन मंजूर झाला.
ऍड. महेश बिर्जे यांच्यासह इतर वकिलांनी जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. या दोघांना चार दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. मात्र कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर शुक्रवारी या दोघांची सुटका झाली आहे.









