मुंबई, पुण्यात ‘कोरोना’मुळे चित्रिकरण ठप्प
अहिल्या परकाळे/कोल्हापूर
‘लखलख चंदेरी सोनेरी सारी दुनिया..’चा इतिहास असलेली कोल्हापुरातील माती.. येथेच स्वदेशी बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला, अधिकतर मुकपट, बोलपटांचे चित्रीकरण झाले. चित्रपटसृष्टीतील इतिहास कोल्हापूरचे नाव सुवर्णपानाने लिहिले आहे. या इतिहासाला जपण्यासाठी कोल्हापुरात चित्रनगरी साकारली. दरम्यानच्या काळात निर्माता, दिग्दर्शकांचा ओढा मुंबई, पुण्यातच राहिला. सद्यस्थितीत मुंबई-पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. ही शहरे रेड झोन बनली, त्यातून चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण ठप्प झाले. अशा अनिश्चिततेच्या काळात चित्रिकरणासाठी निर्माता, दिग्दर्शकांची नजर कोल्हापूरकडे वळली आहे. इनडोअर, आऊटडोअर शुटिंगसाठी कोल्हापूर ‘बेस्ट स्पॉट’ आहे. त्यातूनच येत्या काळात चित्रनगरी सुगीचे दिवस अनुभवणार आहे.
भारतातील पहिला मुकपट राजा हरिश्चंद्रची निर्मिती भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी केले. त्यानंतर कोल्हापुरात भक्त पुंडलिकमधील काही चित्रिकरण त्यांनी कोल्हापुरात केले. तेथूनच कोल्हापुरातील चित्रपटसृष्टील अंकूर फुटले. पेंटर बंधूनी स्वदेशी बनावटीच्या कॅमेरा बनवला. त्याद्वारे चित्रपटाचे छायाचित्रण सुरू झाले. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून एकोणीसाव्या शतकाच्या पुर्वार्धात सिंहगड, सावकारी पाशची निर्मिती केली. त्याचे दिग्दर्शन बाबुराव पेंटर यांनी पेले. ‘सैरंध्री’चे चित्रकरणही कोल्हापुरात झाले. तेथूनच चित्रपटांसाठी कोल्हापूरची माती पूरक ठरली. याच मातीतून चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, अनंत माने, व्ही. शांताराम यांच्यासारखी रत्ने पुढे आली. जयप्रभा, शालिनी सिनेटोन सारखे स्टुडिओ उभारले. अनेक नामवंत कलाकार या क्षेत्रात आले अन् यशस्वी झाले.
कोल्हापुरात मराठीसह काही हिंदी चित्रपटांचें छायाचित्रणही झाले. कपूर घराण्याने मसाई पठार, पंचगंगा घाट परिसरात ‘प्रेमग्रंथ’चे चित्रीकरण केले. स्व. ऋषीकपूर यांनी तो दिग्दर्शित केला होता.. अभिनेता अमीर खान यांच्या ‘सरफरोश’चे शुटींग पन्हाळा येथे झाले. संजय भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चे शुटींग मसाई पठार येथे झाले. या हिंदी चित्रपटांसोबत मराठी हिंदी मालिकांचे चित्रीकरणही कोल्हापुरात होत आहे. सुरू आहे. आजही ही परंपरा कायम आहे. मधल्या काळात पुरेशा सुविधा नसल्याने निर्माता, दिग्दर्शकांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली होती, पण चित्रनगरीच्या उभारणीनंतर हे चित्र बदलले आहे. चित्रनगरीत काही अपुऱया सुविधा असल्या तरी आज मुंबई, पुण्यातील निर्मात्यांसमोर कोल्हापूर हा पर्याय म्हणून समोर आला आहे.
गेली दीड महिना कोरोना साथीमुळे लॉकडाऊन आहे, त्यातही मुंबई, पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. चित्रपट, मालिकांचे शुटींग थांबले आहे. ते केव्हा सुरू होणार, हे अनिश्चित आहे. त्यातूनच इनडोअर, आऊटडोअरसाठी कोल्हापूर चित्रनगरीकडे त्यांची नजर वळली आहे. चित्रीकरणासाठी खर्च कमी, कलाकार, स्टाफवर होणारा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूरची चित्रनगरी चित्रपट, मालिकांच्या शुटींगमुळे सुगीचे दिवस अनुभवणार आहे. येथे पुन्हा एकदा ’लाइट, कॅमेरा, ऍक्शन’चा माहोल पहायला मिळणार आहे.
चित्रनगरी अद्ययावत झाली तरी येथे मालिका, चित्रपटाचे शूटिंग झालेले नाही. कोरोनामुळे मुंबई-पुण्यात चित्रिकरणास अडचणी येत आहेत. चित्रपटसृष्टीच्या उर्जितावस्थेसाठी चित्रपट, मालिकांच्या निर्मात्यांसह हिंदी इंडस्ट्रीजला चित्रनगरीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निर्मिती संस्थांनी कोल्हापुरात दीर्घकाळ शूटिंग करावे, यादृष्टीने येथे सुविधा देण्याची तयारी पालकमंत्री सतेज पाटील यांची ठेवली आहे. त्यांच्या प्रयत्नांना येत्या काळात निश्चितच यश मिळणार आहे.
कोल्हापूर फिल्म इंडस्ट्री वाढवण्यासाठी संधी
कोल्हापुरात चित्रपट मालिकांच्या शुटींगसाठी अनुकुल वातावरण आहे. पुण्या-मुंबईच्या कलाकारांना 14 दिवस कॉरनटाईन करावे. 30-35 लोकांचे युनिट करून सॅनिटायझर करून, आवश्यक त्या सुविधा पुरवत शुटींग सुरू करावे. मराठी, हिंदी मालिकांना कमी खर्चात येथे शुटींग पूर्ण करता येणार आहे. सुमारे 80 एकरांत विस्तारलेल्या चित्रनगरीत आवश्यक सेटससह राहण्यासाठी परिपूर्ण यंत्रणा उभारल्यास येथे फिल्म इंडस्ट्री विकसित होण्यास मदत होणार आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक -रवींद्र गावडे
शुटींग स्पॉट
इनडोअर शुटींग ः चित्रनगरी, किशाबापूचा बंगला, किरण बंगला, प्रतिराज बंगला, गाठांचा वाडा, शिवाजी विद्यापीठ.
आऊटडोअर शुटींग ः अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, भवानी मंडप, न्यू पॅलेस, पंचगंगा घाट. तसेच जिल्हय़ात नृसिंहवाडी दत्त मंदिर, कुरूंदवाडचा ऐतिहासिक घाट, पन्हाळा परिसरातील मसाई पठार, पन्हाळगड, विशाळगड, भुदरगड, वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर. रामलिंग, बाहुबली, तसेच राधानगरी, काळम्मावाडी, दाजीपूर येथील जंगले, तसेच विविध तालुक्यांत असलेली ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, वाडे यांचा समावेश आहे.








