तिसऱ्या आवृत्तीचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन
प्रतिनिधी / सातारा :
श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये ‘गप्पा कोविडायन’च्या अशा अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दीपक प्रभावळकर लिखित कोविडायन : डायरी ऑफ पॅन्डॅमिक संदर्भग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शुक्रवार 18 फेबुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
महामारी सरत असली तरी गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीतील अनेक प्रश्न निरुत्तर आहेत. गेल्या दोन वर्षातील एकुण एक घटना, घडामोडी, औषधांचे प्रोटोकॉल याविषयी जाब विचारायलाच हवा. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांचे शास्त्रोक्त प्रश्नोत्तरे आणि खूप साऱया गप्पांसाठी ‘गप्पा कोविडायन’च्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या गप्पांचे संचलन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व डॉ. राजेंद्र माने हे करणार असून ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोलकर, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
नवनिर्वाचित संचालकांचा होणार सत्कार
पाठक हॉलमध्ये बरोबर 5 वाजता सुरू होणाऱ्या या अनोख्या उपक्रमात नगरवाचनालयाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. हा उपक्रम ऑनलाईनसुद्धा असल्याने संध्याकाळी 5 ते 7 अशा वेळेच्या बंधनातच पार पडणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची असणार उपस्थिती
कोविडायन : डायरी ऑफ पॅन्डॅमिक या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन व सातारकरांच्या गप्पांमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे प्रत्यक्ष सहाभागी होणार होते, मात्र कार्यबाहुल्यामुळे ते ऑनलाईन म्हणजे व्हच्युअल उपस्थित राहून अभिप्राय नोंदवणार आहेत.