प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात सापडलेले कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आतापर्यंतच्या एकूण 69 रुग्णांपैकी 41 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 28 कोरोनाबाधित रुग्ण मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेत आहेत. काल शुक्रवारी राज्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही उलट तीन रुग्ण बरे झाल्याने उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 31 वरून 28 झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
शुक्रवारी 1455 एवढय़ा मोठय़ा संख्येने नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील 984 नमुने निगेटीव्ह आले आहेत तर 471 नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. त्याचबरोबर 93 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर 219 प्रवासी फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये सामाविष्ट झाले आहेत. एकूण 6 जणांना संशयित रुग्ण म्हणून आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहेत. गोव्यात जेवढय़ा झापाटय़ाने कोरोना रुग्णांची संख्या वाढली तेवढय़ाच वेगाने ती कमी झाल्यामुळे दिलासादायक चित्र आहे.
गोव्यात विविध मार्गाने प्रवासी येत असल्याने कमी झालेली रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची देखील शक्यता आहे. विविध रेसिडेन्सी, हॉटेल्समध्ये सुमारे 335 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोविड इस्पितळात उपचार घेत असलेल्या 28 कोरोनाबाधितांची प्रकृती स्थीर आहे. तीन बरे झालेल्या रुग्णांना कांदोळी येथील एका रिसॉर्टमध्ये क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.









