शेळय़ा-मेंढय़ांना चाऱयासाठी दररोज झाडे-फांद्या तोडण्याचा प्रकार : वृक्षतोड करणाऱयांवर कारवाईची पर्यावरणप्रेमींची मागणी

वार्ताहर /काकती
काकती येथील शिवारातील रस्त्यातून सामाजिक वनीकरण विभागामार्फत अनेक झाडे लावण्यात आली आहेत. मात्र शेळय़ा-मेढय़ांच्या चाऱयासाठी दररोज झाडे व फांद्या तोडण्यात येत आहेत. त्यामुळे संवर्धनासाठी कठोर कारवाई व जनजागृती करणे गरजेचे आहे.
येथील काकती शिवारातील रस्त्यावर गेल्या 35 वर्षात 2200 झाडे लावण्यात आली होती. सामाजिक वनीकरण खात्याने सलग तीन वर्षे या झाडांची जोपासना करून ग्राम पंचायतीकडे वर्ग करण्यात आली. पिकाला सावली होते म्हणून थोडय़ाच दिवसात अनेक शेतकऱयांनी झाडे तोडणे व जाळणे, झाडाची सभोवतालची सालं काढून टाकणे असे प्रकार केले. अशाही परिस्थितीत आजपर्यंत झाडांची लागवड करून पुन्हा संवर्धन करण्यासाठी उन्हाळय़ात ट्रक्टरने पाणी घालणे व झाडांचे संरक्षण केल्यामुळे झाडे जोमाने आली आहेत. आंबा, चिकू, जांभूळ, फणस या झाडांच्या फळांचा मुक्त आस्वाद देखील नागरिक घेत आहेत. यासह कडूनिंब, सागवान झाडाचादेखील समावेश आहे. मात्र गेल्या दोन वर्षात झाडांच्या फाद्यांची वारेमाप कत्तल करण्यात आली. यासह शिवारातील खासगी जागेत सावलीसाठी राखण्यात आलेल्या झाडांची कत्तल होत आहे.
पर्यावरण संतुलन व संरक्षणासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे पर्यावरण चांगले राहते. झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो. उन्हात सावली तर पावसात आसरा ही झाडे देत आहेत. झाडांमुळे पक्षांचे कळप देखील दररोज येत असतात. ही झाडे विषारी कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेऊन तापमानवाढ कमी करीत आहेत. वृक्षप्रेमी, ग्रामस्थ व महिला सकाळ-संध्याकाळी उत्तम आरोग्यासाठी या रस्त्यातून मार्गक्रमण करीत आहेत. या झाडांच्या सान्निध्यात शुद्ध प्राणवायुचा पुरवठा साऱयांनाच होत आहे. अशा परिस्थितीत झाडांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करून चालणार नसून संवर्धनासाठी उपाय-योजना आखणे गरजेचे आहे. येथील सामाजिक संस्था, शेतकरी मंडळ, ग्रा. पं. व पर्यावरण व वृक्षप्रेमींनी झाडे-फांद्यांची तोड करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा सर्व शिवार रस्त्यातील झाडे नष्ट होऊन पक्षीसुद्धा दिसणार नाहीत. पक्षी शिवारातील रोग-किडींना खाऊन पिकांना संरक्षण देतात. पर्यावरणाचा समतोल राखल्याशिवाय आपण निरामय जीवन जगू शकणार नाही. याची जाणीव ठेवून झाडे जगविणे व वृक्षतोड करणाऱयांविरुद्ध चळवळ निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.









