सीसीआयबीची कारवाई, सव्वा किलो गांजा जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
शिवाजीनगर येथील कृषी भवनच्या बोळात गांजा विकणाऱया एका तरुणाला गुरुवारी सीसीआयबीच्या अधिकाऱयांनी अटक केली आहे. त्याच्या जवळून 1 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजीव कांबळे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
अनिष चौधरी (वय 27, रा. कसई गल्ली) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संजीव कांबळे, बी. आर. मुत्नाळ, बी. एन. बळगण्णावर, एस. सी. कोरे, एस. एस. पाटील, सी. जे. चिन्नाप्पगोळ, एम. एम. वडेयर, एम. के. कांबळे, अशोक भोसले व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
कृषी भवनजवळील बोळात गांजा विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून अनिषला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 1 किलो 300 ग्रॅम गांजा व 500 रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. जप्त गांजाची किंमत 13 हजार रुपयांइतकी होते. यासंबंधी सीईएन पोलीस स्थानकात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









