प्रतिनिधी / कोल्हापूर
विद्यार्थ्यांना कोरोनाच्या सावटातून बाहेर काढून पुन्हा त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने युवा महोत्सवाचे आयोजन करणे, विद्यापीठाला गरजेचे वाटत होते. त्यावर ऑनलाईन युवा महोत्सव हा तोडगा काढला. सर्वच महाविद्यालयांच्या, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अत्यंत सुरळीतपणाने पार पाडला. विद्यार्थ्यांना यंदा कलागुणांबरोबरच तांत्रिक कौशल्यांची एक वेगळीच देणगी महोत्सवाने विद्यार्थ्यांना दिली, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन झालेल्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा विद्यापीठात पार पडला. विवेकानंद महाविद्यालयाने युवा महोत्सव 2020-2021 चे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले असून या संघास माजी कुलगुरू स्व. आप्पासाहेब पवार चांदीचा फिरता चषक आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, यंदा सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांचेही सहकार्य लाभले, ही बाबही नोंद घेण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीनंतरच्या आयुष्यात उद्भवणारे सारे प्रश्न `आऊट ऑफ सिलॅबस’ असतात. त्यांची उत्तरे आपण मिळविलेल्या ज्ञानाच्या आधारावर आणि व्यावहारिक निकषांवर ज्याची त्यालाच शोधायची असतात. त्याची पूर्वतयारीच जणू या महोत्सवाने विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
आयोजक महाविद्यालयांचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. नीलेश सावे, विवेकानंदचे संघ व्यवस्थापक डॉ. अरित महात, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून केआयटीच्या स्वरदा फडणीस यांनी मनोगते व्यक्त केले. नॅक पिअर टीमसमोर सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी व मार्गदर्शकांना गौरवण्यात आले. 19 कलाप्रकारांतील वैयक्तिक पारितोषिक विजेत्यांना प्रशस्तीपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विविध कलाप्रकारातील विजेते
विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी महोत्सव विभागवार विजेतेपदाचा फिरता चषक प्रदान करण्यात आला. वाङ्मय प्रकारासाठीचा पुरस्कार ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा, श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड यांना विभागून देण्यात आला.