पंढरपूर / प्रतिनिधी
राज्यामधील सरकार पडेल असे वाटत होते. पण, महाविकास आघाडीचे सरकार काय पडताना दिसत नाही. अशा स्थितीत आता शिवसेनेने भाजपासोबत यावे. देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आजही तयार आहेत, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात पत्रकार परिषदेत केले.
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आरपीआयचे राजा सरवदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, सत्तेमध्ये शिवसेनेला अडीच वर्षांचा फार्म्युला मान्य आहे. आता शिवसेनेची अडीच वर्षांची सत्ता झाली आहे. आता त्यांनी भाजपाच्या साथीने सरकारमध्ये असावे. अन्यथा राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्यावर राज्यात भाजपाचे सरकार पुन्हा येऊ शकते. पण शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आता आपण मध्यस्थी करणार आहोत.
तसेच देशामध्ये मोदींच्या विरोधामध्ये सर्व विरोधक एकत्र येत आहेत. कितीही विरोधक एकत्र आले तरी सामान्य मतदार हा मोदींच्या पाठीशी आहे. त्यामुळे 2024 ला मोदीच पंतप्रधान होतील आणि जे लोक मेदींना टक्कर देतील त्यांना चक्कर आल्याशिवाय राहणार नाही, अशीही मिश्किल †िटपण्णी त्यांनी यावेळी केली.
निवडणुकीपर्यत महागाई कमी होईल
देशामध्ये वारंवार इंधन दरवाढ आणि महागाई वाढत आहे. याबाबत विरोधकांकडून निदर्शने देखील होतात. याबाबत रामदास आठवले यांना विचारणा केली असता `निवडणुकीपर्यत महागाई कमी होईल’ असे धक्कादायक विधान केले आहे.