शहर म. ए. समिती-सिंहगर्जना युवक मंडळातर्फे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाप्रश्न तातडीने सोडवावा यासाठी आंदोलन करणारे 67 शिवसैनिक हुतात्मा झाले. शिवसैनिकांनी दिलेल्या योगदानामुळे आजवर सीमाप्रश्न ज्वलंत आहे. सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या शिवसैनिकांना शहर म. ए. समिती व कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळाच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 8.30 वा. कोनवाळ गल्ली येथे अभिवादन कार्यक्रम होणार आहे.
धगधगत्या सीमाप्रश्नाच्या झळा 1969 साली मुंबईपर्यंत पोहोचल्या होत्या. शिवसेना मुंबईमध्ये तेव्हा नुकतीच उभारी घेत होती. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. बेळगावमध्ये होणाऱया उदेकाचे पडसाद मुंबईत उमटत होते. सीमाप्रश्न तातडीने सोडवावा व कर्नाटकची बाजू उचलून धरणारा महाजन अहवाल गाडावा, या मागणीसाठी शिवसैनिक 8 फेब्रुवारी 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना मुंबई येथे निवेदन देणार होते.
हजारोंच्या संख्येने शिवसैनिक मोरारजी देसाई यांना निवेदन देण्यासाठी रस्त्यावर थांबले होते. परंतु त्यांची भरधाव गाडी त्या ठिकाणी थांबलीच नाही. यामुळे शिवसैनिकांनी गाडीखाली उडय़ा मारण्यास सुरुवात केली. गाडीखाली अनेक शिवसैनिक चिरडले गेले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. झालेल्या उदेकामध्ये 64 शिवसैनिक हुतात्मा झाले. शिवसैनिकांचे हे योगदान सीमाप्रश्नासाठी आजही स्फूर्तीदायी ठरते.
शिवसैनिकांनी दिलेल्या या बलिदानाबद्दल त्यांना बेळगावमध्ये अभिवादन करण्यात येते. मंगळवारी होणाऱया अभिवादन कार्यक्रमावेळी मोठय़ा संख्येने मराठी भाषिक व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे व सिंहगर्जना युवक मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गवळी यांनी केले आहे.









