ऑनलाईन टीम / नागपूर :
शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. ते लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेतात. आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका त्यांनी घेतल्या. शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयकावरून काँग्रेस करत असलेले आंदोलन ही देखील लबाडी आहे, असे सांगत पुढे ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 चा आपल्या स्वत:च्याच काँग्रेस पक्षाचा वचननामा पाहिला, तर त्यांनी या विधेयकाला विरोध केला नसता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्राने मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकाला मुळात शेतकर्यांचा या विधेयकांना विरोध नाही. त्यांनी तर स्वागतच केले आहे. मात्र काही नेते केवळ आपली दुकानदारी चालविण्यासाठी याचा विरोध करीत आहेत, अशी खोचक टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.