प्रतिनिधी / सोलापूर
शिवसेनादेखील हिंदुत्ववादाची गोष्ट करते. पण शिवसेनेचा आणि आरएसएसच्या हिंदुत्ववादामध्ये फरक आहे. शिवसेना ही कधीच आरएसएसच्या संबंधातील संघटना नाही. शिवसेनेच्या लोकांनी अनेकवेळा आरएसएसवर अतिशय वाईटपणे टीका केली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी बाळासाहेबांनी भाजपला धुडकावून लावले. मुखर्जी यांनासुद्धा मदत केली. हा इतिहास आहे, त्यामुळे शिवसेना आणि आरएसएस यांच्यातील हिंदुत्वामध्ये फरक असल्याचे मत काँग्रेसचे जेष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.
काँग्रेसचे जेष्ठ नेते हुसेन दलवाई हे सोलापूर दौऱयावर आले असता काँग्रेस भवन येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आ. निर्मलाताई ठोकळ, शहराध्यक्ष प्रकाश वाले उपस्थित होते. दलवाई पुढे म्हणाले, शिवसेनेने इंदिरा गांधींच्या आणिबाणीचे समर्थन केले होते. त्यानंतर लढविलेल्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला मदत केली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी ज्यावेळी निवडणूक लढविली होती, त्यावेळी निवडणूक न लढविता सेनेने काँग्रेसला मदत केली होती. त्या बदल्यात अंतुले यांनी सेनेला विधानपरिषदेच्या तीन जागा दिल्या होत्या. तर भाजप हिंदुत्वाचा झेंडा मिरवत असताना त्यांच्या हिंदुत्वात दलित, मागासवर्गीय आहेत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 1985 मध्ये अनेक ठिकाणी सिंधुदुर्ग वगळता सेनेने काँग्रेसला मदत केली होती. चिपळूणमध्ये आपण जनता दलाचे काम करत असताना काँग्रेसची गावे फोडली म्हणून त्या रागात शिवसेनेच्या लोकांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्याला मारहाण केली होती. ज्यामध्ये आपली एक बरगडी तुटली होती. मला तीन महिने पट्टा लावून फिरावे लागले होते, याची आठवणसुद्धा हुसेन दलवाई यांनी यावेळी सांगितली.
नागरिकत्व कायद्यावर दलवाई म्हणाले, हा कायदा आणायचा होता, तर तो सरळ येऊ शकला असता. परंतु नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून समाजा-समाजात केवळ तेढ निर्माण करण्यासाठी यामध्ये अन्य जातींची नावे टाकली आहेत. यावर सरकार थांबले नाही. जनभावनेचा विरोध असतानासुद्धा हा कायदा पास केला. हा कायदा मुसलमानांच्या विरोधात नसला तरी मुसलमान टार्गेट आहे. समाजामध्ये भाजपाला याच माध्यमातून गोंधळ घालायचा आहे. या माध्यमातून गोळवलकर गुरुजींचे स्वप्न पूर्ण करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते हुसेन दलवाई यांना केला.
दलवाई म्हणाले…
-नागरिकत्व कायद्याला केवळ मुसलमानांचाच नाही तर स्वःपक्षातील नेत्यांचासुद्धा विरोध होत आहे.
-नागरिकत्व कायद्यावरून देशभरात भाजप सरकार असलेली राज्ये वगळता सर्वत्र शांततामय मार्गाने आंदोलन सुरु
-पोलिसांमार्फत हिंसा केली जात आहे.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत बोलायचे आणि घटनेची तोडफोड करायची, असा भाजपचा प्रयत्न. याला आपला कडाडून विरोध आहे.
-नागरिकत्व कायदा मागे घेता येणार नाही, असे मोहन भागवत जर म्हणत असतील तर मोहन भागवत हे देशाचे पंतप्रधान आहेत काय ?
-ज्या-ज्यावेळी देशात एखाद्या गोष्टीवरून वातावरण बिघडले असल्यास, त्या त्या वेळी सरकारने ती गोष्ट मागे घेतली पाहिजे.
-सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी निश्चित त्याग केला आहे, हे मान्यच करावे लागेल
-सावरकरांच्या बाबतीत आताच वाद निर्माण करणे चुकीचे आहे
-महाराष्ट्रातील सरकार पाच वर्षे तर टिकेलच. परंतु पुढची 25 वर्षे हटणार नाही
-महाराष्ट्रातील मुसलमान नेत्यांना सत्तेत सामावून घेणे गरजेचे आहे
-आम्ही मुसलमान आहोत, अल्लाला मानणारे आहोत. इथल्या संस्कृतीशी जवळचे संबंध आहेत. विठोबाच्या मंदिराबाहेर कुंकू विकणारा आमचा मुसलमान आहे, हे आम्ही कधीच विसरत नाही.