आग्रा ते राजगड गरुड झेप मोहीम
प्रतिनिधी/ सातारा
औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते मोगलांच्या नजरकैदेतून अत्यंत चाणाक्ष बुद्धीने युक्ती लढवली महाराज या कैदेतून निसटल आणि गरुड झेप घेऊन राजगडावर सुखरूप पोहोचले. या ऐतिहासिक घटनेला 355 वर्षे पूर्ण होत आहेत ही घटना म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली ’गरुड झेप’ होय. या संघर्षाला शिवरायांची झुंजार लढय़ाची प्रेरणा होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जपण्यासाठी आग्रा ते राजगड व राजगडाहून कोल्हापूरकडे निघालेल्या शिवप्रेरणा ज्योतीचे रविवारी साताऱयात शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिवादन करुन जल्लोषी स्वागत करण्यात आले.
कोल्हापूरातील हिल रायडर्स एडवेंचर फाउंडेशनचे 30 शिलेदार व शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचचे अध्यक्ष सुरज ढोला व मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली आग्रा येथून ही शिवप्रेरणा ज्योत घेवून आले आहेत. स्वराज्याची राजधानी राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन कोल्हापूरकडे दौडत चाललेल्या या शिवप्रेरणा ज्योतीचे सायंकाळी 5 वाजता साताऱयात आगमन झाले. यावेळी शिवतीर्थावर सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष व ’तरुण भारत’ चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण, कराडच्या श्री रेफ्रिजेशनचे असिस्टंट मॅनेजर रुपेश दळवी व सौ. धनश्री दळवी यांच्यासह विविध मान्यवर व शिवप्रेमींनी शिवप्रेरणा ज्योतीचे स्वागत केले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवप्रेरणा ज्योत घेवून आलेल्या 30 शिलेदारांनी जलमंदिर पॅलेसवर जावून तिथे आई भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेवून आशीर्वाद घेतले.
बाराशे कि. मी. अंतराची गरुड झेप
हे महाराष्ट्रातील शूरवीर मावळे आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन आले असून या गरुड झेप मोहिमेत बाराशे किलोमीटर अंतर पार केले आहे. मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सुरु असून या शिलेदारांनी ऊन, वारा, पाऊस, वादळ वारा याची तमा न बाळगता शिवप्रेरणा ज्योत घेऊन धावत राजगडावर गेले आणि तिथून कोल्हापूरकडे प्रवास सुरु केला आहे. या मोहिमेमध्ये येताना विविध प्रांतांमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके पोवाडे व शिवरायांचा जयजयकार करीत गरुड झेप मोहीम यशस्वी केली आहे.
सकल हिंदूंच्या मनात जागवली प्रेरणा
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका या ऐतिहासिक घटनेला 355 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही या घटनेमुळे सदर मराठी तसेच सकल हिंदूजनांच्या मनात प्रेरणेची शौर्याची आणि धैर्याची लहर दौडत शेकडो वर्षे पारतंत्र्यात परकीयांच्या जोखडाखाली पिचलेल्या रयतेला स्वातंत्र्याचा मंत्र देत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली होती या संघर्षाला मागे शिवरायांची झुंजार लढय़ाची प्रेरणा होती हीच प्रेरणा जिवंत ठेवत ठेवण्यासाठी या गरुड झेप मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
आज कोल्हापूरात जंगी स्वागत सोहळा
शिवप्रेरणा ज्योत सातारा कराड पेठ नाका मार्गे करवीर नगरी दि. 30 रोजी पोहोचणार असून करवीर नगरी मध्ये या शिवप्रेरणा ज्योतीचे स्वागत मोठय़ा प्रमाणात करण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या शौर्याची धैर्याची प्रेरणा सर्व युवक, युवतींना मिळावी म्हणून ही शिवप्रेरना ज्योत कोल्हापुरा मधील गडकोट व ऐतिहासिक ठिकाणी नेण्याच्या उद्देशाने पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड अशा विविध तालुक्यातील गडकोट ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत.








