शिरोळ : प्रतिनिधी
येथे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती मन्सूर मुलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून माजी उपसभापती व विद्यमान सदस्य संजय माने यांना पुन्हा उपसभापती पदाची संधी मिळणार आहे.
येथील पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उदगाव मतदारसंघातील सदस्य मन्सूर मुलानी यांची 26 ऑक्टोंबर 20 21 रोजी उपसभापती पदावर निवड करण्यात आली होती. आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदावर शिवसेनेचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य संजय माने उपसभापतीपदी निवड होणार आहे.
सध्या नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाच्या सौ. दिपाली परीट या सभापती आहेत. या पंचायत समितीवर नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या गटाची सत्ता आहे सर्व सदस्यांना सभापती व उपसभापती पदाची संधी देण्यात नेतेमंडळी यशस्वी झाले आहेत.
येत्या 14 मार्च 2022 रोजी या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. विद्यमान पदाधिकारी व सदस्य आपापल्या मतदार संघात कामाचा धूम धडाका सुरू केला असल्याचे दिसून येते. शिवसेनेचे सदस्य संजय माने यांची यापूर्वी उपसभापती पदावर निवड करण्यात आली होती. तर प्रभारी सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे पुन्हा त्यांना उपसभापती पदाची संधी मिळणार आहे.