प्रतिनिधी / कोल्हापूर
शिरोली एमआयडीसी येथील फॉंड्रीमध्ये काम करत असताना फाँड्रीचा लावा अंगावर पडल्याने तरुण कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. प्रकाश दिनकर पोतदार (वय 30 रा. सुधाकर जोशी नगर, संभाजीनगर) असे त्याचे नांव आहे. दरम्यान या घटनेची जबाबदारी स्विकारुन संबंधीत फाँड्री मालकाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिली. तसेच संबंधीत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने सिपीआर रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश पोतदार हे आई, पत्नी, मुलग्यासह सुधाकर जोशी नगर येथे राहतात. गेल्या दहा वर्षापासून प्रकाश शिरोली एमआयडीसी येथील एका फाँड्रीमध्ये कामास आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना 4 वर्षाचा मुलगा आहे. बुधवारी प्रकाश यांची शिफ्ट रात्री बारा ते सकाळी आठ अशी होती. बुधवारी रात्री 11 वाजता ते घरातून कामासाठी निघाले. मध्यरात्री प्रकाश काम करत असताना त्यांच्या अंगावर लावा पडला. यामध्ये प्रकाश भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्र परिवार सिपीआरमध्ये दाखल झाले. संबंधीत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत सिपीआर रुग्णालयात गर्दी केली. सिपीआर रुग्णालयाच्या आवारातील तणाव वाढल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.
सकाळी नातेवाईकांनी या प्रकरणाची चौकशी करा, संबंधित मालक व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कुटुंबाला आर्थिक हातभार द्या अशा मागण्या करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. यात नातेवाईकांसह माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, विजय खाडे पाटील, दिग्विजय मगदूम, गुणवंत नागटीळे, शिवाजी शेटे, संजय गुदगे, प्रभाकर गायकवाड, प्रदीप मस्के, सचिन आडसूळ आदींचा सहभाग होता. शवविच्छेदन विभागात जवळ तणाव वाढल्याने मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोतदार यांच्या मागे आई, पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.