वार्ताहर / कोकरूड
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मागील 24 तासात 185 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चांदोली धरणाचे पाणी नदी पात्रात सोडल्याने पूरस्थिती निर्माण होऊन पश्चिम भागातील 4 पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात चौथ्या दिवशी पावसाचा थोडा जोर वाढला असून चांदोली धरणाच्या सांडव्यातून 3000 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. आरळा- शित्तुर पूल, चरण- सोंडोली पूल, कोकरुड- रेटरे पूल, बिळाशी- भेडसगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे वारणा नदीचे पात्र तुडुंब भरुन वाहत असून वारणा नदी वरील कोकरुड-रेठरे दरम्यानचा पूल मंगळवारी सायंकाळी पाण्याखाली गेला असल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. तर बाकीचे तीन पूल आज पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
मागील 24 तासात 185 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर ढगफुटी सारखा पाऊस गुरुवार सकाळपासून कोसळत होता. वारणेला आलेल्या पुरामुळे सर्व परिसर जलमय झाला आहे. तर नदी काठावरील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. असाच पाऊस कोसळत राहिला तर महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Articleसुशील कुमारची ‘ती’ मागणी तिहार जेलने केली पूर्ण
Next Article चीनमध्ये धावली ‘फ्लोटिंग ट्रेन’








