भारतासह गोव्यातही पूर्वापार अस्तित्वात असलेल्या पद्धती
जय उत्तम नाईक / पणजी
कोरोना महामारीमुळे आज ‘लॉकडाऊन’, ‘कोरोन्टाईन’ यासारख्या अनेक नव्या शब्दांची आपल्याला ओळख झालेली असली तरी त्यातून अर्थ निघणाऱया उपचार पद्धती शेकडो वर्षांपासून भारतात आणि आपल्या गोव्यातसुद्धा अस्तित्वात होत्या आणि आहेत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
कोरोना महामारीने सध्या जगभरात थैमान घातले आहे. हाहाकार माजवलेला आहे. मानवी डोळ्यांना दिसतसुद्धा नाही असा एक सुक्ष्म जीव आज संपूर्ण मानवजातीच्याच मुळावर उठलेला आहे. चंद्राला गवसणी घातल्यानंतर सुर्याच्या दिशेने झेपावलेला माणूस सध्या या काळरुपी अदृष्य जीवाच्या विकट कवेत पुरता अडकला आहे. त्यातून आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त माणसांना अगदी कीडी – मुंग्यांप्रमाणे त्याने पायदळी तुडवले आहे. सग्यासोयऱयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्काराचे सुद्धा भाग्य लाभू नये एवढी ही माणसे दुर्दैवी, कमनशिबी ठरलेली आहेत. माणूस पुरता हतबल, असहाय्य बनलेला आहे.
माणसेच नव्हे तर देवदेवतांनासुद्धा कोरोन्टाईन
या महामारीने माणसेच नव्हे तर देवदेवतांनासुद्धा कोरोन्टाईनमध्ये ठेवलेले आहे. देवाचा धावा करायचा म्हटले तरी मंदिरातसुद्धा जाता येत नाही, अशी स्थिती आहे. कित्येक मंदिरांचे कालोत्सव, जत्रोत्सव आणि अन्य धार्मिक विधी सरळसरळ बंद वा रद्द करण्याची पाळी आलेली आहे. अशा अवस्थेत सध्या संपूर्ण मानवजातच जशी काही पूर्ण नैराश्येच्या गर्तेत सापडली आहे. स्वतःवरील विश्वासच गमावून बसल्यागत झालेली आहे.
असे असले तरी यापूर्वी या वसुधेवर महामारीचे संकट आलेले नव्हते, अशातला भाग नाही. आपल्या देशातसुद्धा अशा महामाऱया येऊन गेलेल्या आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडनायक संतश्रेष्ठ श्रीसाईबाबांच्या हयातीत अशीच एक महामारी आली होती. त्यातून आपल्या शिरडी नगरीचे रक्षण करण्यासाठी साईंनी त्यावेळी शिरडीला ‘लॉकडाऊन’ केले होते.
श्रीसाईसच्चितकार गोविंद रघुनाथ दाभोलकर म्हणजेच ‘हेमाडपंत’ यांना वर्ष 1909 मध्ये श्रीसाईंचे प्रथम दर्शन घडले. त्यानंतर ते त्यांचे परमभक्त बनले. श्रीसाईंनी समाधी घेतले ते वर्ष 1918 होते. म्हणजेच महामारी आलेले वर्ष हे सदर दोन्ही वर्षांदरम्यानचे होते हे सिद्ध होते.
असेच एक दिवस सकाळी हेमाडपंत श्रीसाईंच्या दर्शनासाठी शिरडी मशिदीत गेले असता कृपावंत श्रीसाईनाथ स्वतः दाते मांडून गहू दळण्यास बसलेले त्यांना दिसले. हा सोहळा पाहून हेमाडपंत प्रचंड आश्चर्यचकीत झाले. बाबांनी एका रिकाम्या गोणीवर दाते मांडले. त्यावर घट्ट खुंटी ठोकली. तत्पूर्वी त्यांनी सुपात भरून गहू शेजारी ठेवले होते. दाते मांडून झाल्यानंतर बाबा दोन्ही पाय पसरून त्याच्या शेजारी बसले. आपल्या हातांच्या दोन्ही अस्तन्या वर सरकवल्या. कफनीचाही घोळ आवळला. नंतर एका हाताने खुंटी पकडली आणि दुसऱया हाताने सुपातील मुठभर गहू दात्यात टाकले. मान खाली घालून बाबांनी भरभरा ते गहू दळण्यास सुरुवात केली.
हा हा… म्हणता ही वार्ता गावभर पसरली. बाया-बापुडे मशिदीकडे धावत सुटले. काही महिलांनी तर बाबांच्या समोरच बैठक मारली. बाबांच्या हातातील खुंटी झोंबून घेत त्या स्वतः दळण दळू लागल्या. तोपर्यंत बाबांच्या मनात काय चालले होते याची कुणालाच कल्पना येत नव्हती, थांगपत्ता लागत नव्हता. ‘बाबा तर स्वतः भिक्षावृत्तीचे. त्यांना ना घरदार, ना संसार. तरीही एवढे पीठ ते का म्हणून बनवत असावेत?’, अशा असंख्य विचारांचे काहूर प्रत्येकाच्या मनात माजले होते. त्याचबरोबर काही हावरट, लोभी बायांच्या मनात मात्र, ‘ते पीठ आपल्याला मिळाले असते तर किती बरे झाले असते’, असे विचारही तरंगून जात होते. बाबा मात्र स्वतःमध्ये कार्यमग्न होते. त्यांचे कुणाकडेच लक्ष नव्हते.
पीठ गावच्या वेशीवर टाकून या
दळण संपताच काही महिलांनी ते पीठ सुपात भरले. त्यातील एकदोघींनी त्यातील थोडे पळविण्याचेही प्रयत्न केले. तो प्रकार पाहताच एवढा वेळ कुणाशीच चकार शब्द न बोलणारे बाबा अचानक भानावर आल्यागत त्या महिलांवर जोरदार ओरडले. ‘वेड लागलेय का तुम्हाला, कुठे घेऊन चालल्या आहात? मला लुटून फुकटचे खायला हा काय तुमच्या बापाचा माल आहे?’ असे एक नव्हे अनेक खडे बोल बाबांनी त्यांना सुनावले. बाबांचा तो अवतार पाहून त्या महिलांची बरीच फजिती झाली. परंतु बाबांचा राग हा क्षणिक आणि लटिक होता. ते लगेच शांत झाले आणि म्हणाले, ‘आता पीठ उचललेच आहे तर तसेच घेऊन जा आणि गावच्या वेशीवर टाकून या’. बाबांची आज्ञा होताच सर्वांनी ते पीठ नेऊन गावच्या शिमेवर टाकले. त्यायोगे गावात महामारी येणे टळले. हे पीठ शिमेवर टाकणे म्हणजे त्यावेळचे ‘लॉकडाऊनच’ होते.
हा प्रसंग हेमाडपंतांनी स्वतः अनुभवला. त्यासंबंधी नंतर त्यांनी गावातील लोकांशी चर्चा केली. त्या चर्चेतून श्रीसाईंच्या अन्य कित्येक चमत्कारांची माहिती मिळाली. त्यातून ते अनुभव, चमत्कार पुस्तकरुपी लिहून काढण्याची प्रेरणा त्यांना झाली. त्या प्रेरणेतूनच पुढे श्रीसाईंच्या आशीर्वादाने श्रीसाईसच्चरित या महान ग्रंथाचा पाया रचला गेला व तो सफळ संपूर्ण झाला, असे स्वतः लेखकानेच म्हटलेले आहे.
शिरगावात परंपरेने ‘कोरोन्टाईन’ पद्धती
असाच दुसरा प्रकार म्हणजे कोरोन्टाईन. जो आपल्या गोव्यात शेकडो वर्षांपासून प्रसंगानुरूप निरंतर करण्यात येत असतो. शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात. आदिशक्ती लईराईला अग्नीची देवीही म्हणतात. त्यामुळे या देवीच्या जत्रोत्सवात अग्नीचाही उत्सव होतो. भलेमोठे होमकुंड पेटवून त्याच्या रखरखत्या अग्नीतून देवीचे हजारो भक्तगण धोंड अग्निदिव्य करतात.
या अग्निप्रवेशासाठी धोंडांना पूर्ण शुचिर्भूत म्हणजे सदाचरणी, स्वच्छता राखून, सोवळे पाळून पूर्ण पाच दिवस प्रखर व्रताचरण करावे लागते. तरीही या व्रतादरम्यान काहीजणांकडून काही चुका होतातच. एवढेच नव्हे तर व्रतपालनासंबंधी स्वतःच संशयी असल्यासही असे धोंड अग्निदिव्या दरम्यान आगीत पडतात, भाजतात.
त्यांचा डॉक्टर देवी लईराईच
असे प्रकार दरवर्षी घडतातच असे नाही. कधी कधी एकही घटना घडत नाही. तर कधी चार-पाचजण सुद्धा होमकुंडात पडून भाजतात. मात्र अशा जखमी धोंडांना कधीच कोणताही डॉक्टर किंवा इस्पितळात नेण्यात येत नाही. त्यांचा डॉक्टर देवी लईराईच असते. त्याचसाठी अशा धोंडांना गावातीलच श्रीरवळनाथ मंदिराच्या शेजारी एका खास खोलीत ठेवण्यात येते. देवीला सर्वाधिक प्रिय असलेली मोगरी व पिटकुळी या फुलांपासून खास लेप बनवून त्यांच्या जखमांवर उपचार करण्यात येतात. त्यांना रोज देवीचे तीर्थही प्राशन करण्यास देण्यात येते. याच उपचारांतून पूर्ण बरा होऊन धोंड घरी जातो.
हा कालावधी कितीही दिवसांचा असला तरी, तोपर्यंत सदर धोंड त्या खोलीतच राहतो. बाहेरील कुणालाच त्याच्याजवळ जाऊ देण्यात येत नाही. संसर्ग होऊ नये यासाठीच ही व्यवस्था असते. हे एक प्रकारचे ‘विलगीकरणच’ असते. आज त्यालाच आपण ‘कोरोन्टाईन’ म्हणतो.