कोणालाही आत व आतून बाहेर येण्यास मज्जाव. कडक पोलीस बंदोबस्त व नाकाबंदी. पत्रकारांनाही प्रवेश नाही.
प्रतिनिधी / डिचोली
येत्या मंगळ. दि. 28 एप्रिल रोजी शिरगव गवातील देवी श्री. लईराईची जत्रा रद्द करण्यात आली असली तरी देवीच्या श्रध्दा भक्तीने शिरगावात भाविक येण्याची शक्मयता ओळखून डिचोली पोलिसांनी शिरगाव गावात प्रवेश करणाऱया सर्व रस्ते व वाटा बंद केल्या आहेत. काल रवि. दि. 26 रोजी अस्नोडा येथून शिरगावात प्रवेश करणारा रस्ता मुड्डी येथे तर पैरा येथून रेल्वे गेटमार्गे शिरगावात प्रवेश करणारा रस्ता बंद करून पोलीस तैनात करण्यात आले आहे.
यावषी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे राज्यात लॉकडाउन असल्याने 144 हे जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शिरगावची जत्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने जाहीर केला होता. तसेच देवीच्या राज्यभर विखुरलेल्या धोंडगणांनी आपापल्या घरातच देवीचे सोवळे व्रत पाळावे असे आवाहन केले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येने देवीच्या धोंडगणांनी आपापल्या घरातच कडक सोवळे व्रताला प्रारंभ केला आहे.
शिरगावात प्रवेश करणाऱया सर्व वाटा बंद.
मंगळवारी जत्रोत्सवाच्या दिवशी मंदिर बंद असल्याने शिरगावात कोणीही भाविक भक्तांनी येऊ नये असे आवाहन करण्यात आले असतानाही जर गावात कोणीही येऊन गर्दी केल्यास कायद्याचे उल्लंघन होईल. या शक्मयतेने शिरगाव गावात प्रवेश करणारे सर्व रस्ते व वाटा पोलीस व गावातील लोकांंनी बंद केल्या आहेत. त्यासाठी पंचायतीनेही डिचोली पोलिसांना पत्र लिहून मानसवाडा मुळगाव ते शिरगाव, अस्नोडा पुल ते शिरगाव, ब्राह्मण देवस्थान पैरा ते शिरगाव, सिध्दीविनायक मंदिर पैरा ते शिरगाव व रेल्वे पुल पैरा ते शिरगाव असे शिरगावात प्रवेश करणारे प्रमुख पाच मार्ग 28 एप्रिलपर्यंत बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यापैकी अस्नोडा ते शिरगाव व पैरा रेल्वे गेट मार्गे शिरगाव हे दोन मुख्य रस्ते बंद करण्यात आले नव्हते. ते काल रवि. दि. 26 रोजी सकाळी पूर्णपणे बंद करण्यात आले व तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गावातील कोणालाही गावातून बाहेर जाण्याची व बाहेरून आत येण्याची अनुमती नाही.
गावातील रस्ते कडकपणे बंद करण्यात आले असून पोलिसांकडून कोणालाही आत व आतून बाहेर सोडले जात नाही. गावात त्या प्रकारे आवाहनच करण्यात आले होते. एकदा गावच्या सीमा बंद केल्यानंतर कोणालाही गावात घेतले जाणार नाही व गावातूनही कोणाला बाहेर सोडले जाणार नाही, असे कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे सध्या गेटवरील पोलीस गावात येण्यास प्रयत्न करणाऱया प्रत्येकाकडे पत्ता नमूद असलेल्या ओळखपत्राची मागणी करीत आहेत. त्याशिवाय कोणालाही आत प्रवेश न देण्याचा त्यांना आदेशच देण्यात आला आहे. केवळ दुध, भाजीपाला व इतर जिवनावश्यक वस्तूंची वाहनेच आत सोडयाची मुभा आहे.
पत्रकारांनाही प्रवेशास बंदी ?
जत्रोत्सव रद्द करण्यात आला असतानाही त्या दिवशी गावात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी गावातील सर्व प्रवेश करणारे मार्ग बंद करण्यात आले असून पत्रकारांनाही आत सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिरगावचे सरपंच भगवंत गावकर यांनी तसे नमूद केले असून पत्रकारांनाही विनंती केली आहे. शिरगावातील या जत्रेविषयी वृत्तांकन करण्यास आलेल्या काही पत्रकारांना काल रविवारी गावात प्रवेश करणाऱया गेटवरून माघारी पाठविण्यात आले.









