इस्माकडून माहिती सादर : साखर विक्रीला सरकारचा हिरवा कंदील
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कोविड19च्या विळख्याला थोपविण्यासाठी सरकारने सर्व ठिकाणी संचारबंदी लागू केली होती. यामुळे देशातील उद्योग व्यवसाय ठप्प पडले होते. परंतु आता सरकारने दोन महिन्यांच्या कालावधीनंतर काही प्रमाणात नियम व अटीच्या आधारे शिथिलता दिली असल्यामुळे विविध व्यवसाय रुळावर येत आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा असणारा साखर उद्योगही येत्या काळात आघाडी घेऊ शकणार असल्याचे भारतीय साखर कारखाना संघाकडून सांगण्यात आले आहे.
देशात साखर मागणी हळूहळू वाढत जाणार असून यामध्ये हॉटेल रेस्टॉरन्ट आणि अन्य क्षेत्रे सुरु होत असल्याने हा बदल होताना पहावयास मिळणार आहे. अनलॉक भारत या घोषणेमुळे मॉल्स, हॉटेल, सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील व्यवसाय सुरु होत असल्यामुळे साखर मागणीत तेजी येणार असल्याचा अंदाज आहे.
साखर कारखान्यांकडे मे महिन्यात शिल्लख असलेली साखर व जून महिन्यातील साठा यांची विक्री करण्यात येणार आहे. यामधील सरकारने मे महिन्यात 17,00,000 टन आणि जूनमध्ये 18,50,000 टन इतकी साखर विकण्यासाठी मान्यता दिली आहे. या अगोदर फेब्रुवारीत साखर कारखान्यांनी 10 लाख टन अतिरिक्त साखरेची विक्री केली होती.
उत्तर भारतामधील साखर कारखाने मे महिन्यात त्यांच्याकडे असणाऱया मासिक साखरेचा साठा विकण्यात अपयशी ठरले आहेत तर दुसरीकडे मात्र पश्चिम आणि दक्षिण भारतामधील कारखान्यांकडे असणारा महिन्याचा साखर साठा विकण्यात यश मिळाले असल्याचे इस्माने सांगितले आहे.









