खानापूर बीईओंचा खानापूर तालुका म. ए. समिती शिष्टमंडळाकडे खुलासा
बातमीदार /खानापूर
भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या आदेशाविरुद्ध मराठी व उर्दू माध्यम शिक्षकांना पत्रव्यवहार केवळ कानडी भाषेतून करावा, अशी जाचक अट घातल्यामुळे म.ए.समितीच्या पदाधिकाऱयांनी निवेदन देऊन क्षेत्र शिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांना जाब विचारला. तेव्हा आपण आपल्या कार्यालयातून असा कोणताही आदेश जारी केला नाही. आपणाकडे कोणीतरी ही चुकीची तक्रार केली असावी. तसे असल्यास माझ्या निदर्शनास आणावे, मी त्यावर निश्चितच विचार करून भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे अधिकार अबाधित ठेवेन, असे निवेदन देण्यास गेलेल्या खानापूर तालुका म.ए. समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
नव्वद टक्के पत्रव्यवहार मराठी भाषेतूनच आपल्याकडे येतो. तो आम्ही स्वीकारतो. आम्ही कोणत्याही शिक्षकांला कानडी सक्तीचा आग्रह धरला नाही, असे यकुंडी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, म.ए.समितीचे यशवंत बिरजे, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, विशाल पाटील, विठ्ठल गुरव, अर्जुन देसाई, प्रकाश चव्हाण, अमृत पाटील, सेवानिवृत्त मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डी. एम. भोसले आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.









