विधानपरिषद सदस्यांनी घेतली भेट
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षक व शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी विधानपरिषद सदस्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना येत्या अर्थसंकल्पामध्ये विशेष अनुदानाची तरतूद करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. सरकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुदानाची गरज आहे. त्या अनुदानाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करावी, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे 1995 नंतर ज्या शाळा सुरू झाल्या आहेत, त्या शाळांना अनुदान देणे, तसेच काल्पनिक वेतन आणि बढतीची समस्या सोडवावी, असे या निवेदनात म्हटले आहे. अनुदानित असलेल्या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱयांना पेन्शन सुविधा दिली पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या तातडीने भराव्यात. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱयांना वैद्यकीय खर्च द्यावा, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, आयनूर मंजुनाथ, साशिल नामोशी, पुट्टण्णा, वाय. ए. नारायणस्वामी, चिदानंद गौडा, हनुमंत निराणी, अदेवेगौडा, एस. व्ही. सावनूर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी निवेदन स्वीकारून निश्चितच याबाबत चर्चा करून समस्या सोडवू, असे आश्वासन दिले आहे.