प्रतिनिधी /कुठ्ठाळी
गोव्यात सध्या कोविड 19 व ओमीक्रॉन लाट भयावह वेगाने पसरत असून विद्यालयात जाऊन ऑनलाइन वर्ग घेणारे अनेक शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर बाधित होत आहेत. यातील बहुतांशी शालेय कर्मचारी सार्वजनिक वाहतुक सेवेचा अवलंब करून प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे घरातील वृद्ध तसेच लहान मुलांच्या सुरक्षेचा विचार करताना या संदर्भात पहिल्या लाटेवेळी ज्याप्रमाणे शिक्षक घरी राहून ऑनलाइन वर्ग घेत होते तीच पद्धत लागू केली तर ज्ञानदानात विक्षेप न करता सर्व मुलांना विनासायास शिकवता येईल. तसेच पन्नास टक्के उपस्थिती लावून दर दिवसाआड शिक्षक शाळेत जाऊन विद्यायलयाची अनुषंगिक कामे करू शकतील. तरी या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षण संचालकानी पुढाकार घेण्याबाबत माननीय गोवा बोर्डाच्या अध्यक्षांनी त्यांच्याशी संवाद साधावा अशी विनंती करणारे निवेदन गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेटय़े यांना शिक्षक प्रतिनिधी गोपाळ प्रभू तसेच संजय नाईक यांनी दिले आहे.









