शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची माहिती : कौन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर
प्रतिनिधी /बेंगळूर
अनेक दिवसांपासून शिक्षकांना प्रतिक्षा असलेल्या बदल्यांच्या प्रक्रियेची अधिसूचना अखेर शिक्षण खात्याने जारी केली आहे. 1 जुलैपासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. शिक्षकांना कौन्सिलिंगद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी बदली करून घेण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले.
2019-20 या शैक्षणिक वर्षात सक्तीच्या बदल्या, अतिरिक्त बदल्या झालेल्या शिक्षकांना यावेळी प्राधान्य देण्यात येत आहे. याबरोबरच 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षातीलही शिक्षक बदल्यांची प्रक्रिया होणार आहे. प्राथमिक शालेय शिक्षकांच्या बदल्यांचे कौन्सिलिंग सार्वजनिक शिक्षण खात्याचे उपसंचालक आणि माध्यमिक शालेय शिक्षकांचे कौन्सिलिंग खात्याचे संबंधित विभागीय संचालक करणार आहेत, अशी माहिती सुरेशकुमार यांनी यावेळी दिली आहे.
30 जूनपर्यंत रिक्त असलेल्या शिक्षक पदांची माहिती 12 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 2019-20 या वर्षात तालुका/ जिल्हय़ातून बाहेर सक्तीच्या अतिरिक्त बदल्या झालेल्या शिक्षकांची यादी 19 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल. तर अलिकडेच बदल्यांसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची अंतिम यादी 22 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त बदल्यांसाठी इच्छुक असणाऱया शिक्षकांना 23 ते 29 जुलै या कालावधीत अर्ज करता येतील. या शिक्षकांची तात्पुरती यादी 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे.
दरम्यान, 3 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या कालावधीत तात्पुरत्या यादीसंबंधी आक्षेप दाखल करता येतील. 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत अर्जांची पडताळणी करून स्वीकृत व फेटाळलेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध हेणार आहे. फेटाळलेल्या अर्जांसंबंधी तक्रारी असतील तर विभागीय संचालक 17 ते 21 ऑगस्ट या कालावधीत जाणून घेतील. 20 ऑगस्ट रोजी कौन्सिलिंगची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत आक्षेप स्वीकारतील. 8 सप्टेंबर रोजी कौन्सिलिंगसाठी अर्हता/ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 15 सप्टेंबरपासून प्राथमिक व 21 सप्टेंबरपासून माध्यमिक शालेय शिक्षकांसाठी कौन्सिलिंग सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अतिरिक्त/सक्तीच्या बदल्यांची प्रक्रिया 12 जुलै रोजी सुरू होईल. तर 21 सप्टेंबर रोजी कौन्सिलिंग होणार आहे. 2020-21 या सालातील बदल्यांची प्रक्रिया 27 जुलै रोजी सुरू होईल तर 14 जानेवारी 2022 रोजी कौन्सिलिंग होणार आहे. 2021-22 या वर्षांतील बदल्यांची प्रक्रिया 27 जून रोजी सुरू होईल तर 26 फेब्रुवारी 2022 पर्यंत कौन्सिलिंग होणार आहे.









