सोन्याळ/प्रतिनिधी
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेकडून कोणत्याही कारणाने मयत झालेल्या शिक्षक बँकेच्या सभासदाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी तातडीचा निधी म्हणून सद्या शिक्षक बँकेकडून संबंधितांच्या कुटूंबियांना दोन हजार रुपये देण्यात येते. मात्र सध्याच्या काळात हा निधी फारच तोकडा असून यात भरीव अशी वाढ करून किमान वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक नेते आप्पासाहेब सौदागर यांनी बँकेकडे केली आहे.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक ही जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांची जिवाभावाची बँक असून या बँकेकडून शिक्षक सभासदांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी अनेक सोयी-सुविधा राबविण्यात येत आहे. शिक्षक सभासदांसाठी हिताची बँक असल्या कारणाने शिक्षकही याच बँकेवर अधिक अवलंबून असतात. शिक्षक बँक शिक्षकांकडून कर्ज काढताना व वर्षातून दोन वेळा मयत फन्ड गोळा करून घेते. या बँकेच्या एखाद्या शिक्षक सभासदाचा आकस्मिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी बँकेकडून मयत फंड अंतर्गत तातडीची निधी म्हणून त्यांच्या कुटुंबियांना रुपये दोन हजारांची मदत देण्यात येते. अंत्यसंस्कारासाठी तातडीने देण्यात येणारा हा निधी अंत्यत तुटपुंजा आहे.चालू काळात महागाईचा विचार करता दोन हजार रुपये खूपच कमी आहे.त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी लागणाऱ्या तातडीच्या निधीत भरीव वाढ करण्यात यावी. किमान वीस हजार रुपयेची तरतूद अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी करण्यात यावा अन्यथा हा निधी बंद तरी करावा अशी मागणी शिक्षक नेते आप्पासाहेब सौदागर यांनी बँकेच्या शिक्षक संचालक मंडळाकडे केली आहे.