दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय, खरी शिकार जंगलात, पिंजऱयात नव्हे
दक्षिण आफ्रिकेने शिकारीसाठी सिंह पाळण्यावर बंदी घातली आहे. याला ऐतिहासिक निर्णय मानण्यात येत आहे, कारण ट्रॉफी हंटिंग म्हणजेच मनोरंजनासाठी शिकारच्या व्यवसायाद्वारे देशाला सुमारे 2,500 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. हा आकडा देशाच्या जीडीपीच्या सुमारे 7 टक्के इतका आहे.
ट्रॉफी हंटिंगसाठी येथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. येथील फार्मवर विशेष स्वरुपाने तयार करण्यात आलेले सिंह, हत्ती, गेंडा, बफेलो आणि सांबर यासारख्या प्राण्यांची शिकार करतात. याकरता पर्यटकांना मोठी रक्कम द्यावी लागते. यातही सर्वाधिक मागणी सिंहाच्या शिकारीची आहे, सिंहाला मारल्यावर पर्यटक छायाचित्रे काढून घेत त्याचे अवय घरातल्या भिंतींवर टांगत असतात.
बंदीच्या निर्णयामुळे हा महागडा शौक आता पूर्ण होणार नाही. आम्ही सर्व घटकांशी चर्चा केल्यावर हा निर्णय घेतला आहे. या निर्णयमुळे प्राण्यांचे फार्मिंग करणाऱयांवर प्रभाव पडणार हे आम्ही जाणतो, पण खरी शिकार जंगलांमध्ये होते, पिंजऱयामध्ये कैद प्राण्यांची नव्हे असे उद्गार पर्यावरण मंत्री बारबरा क्रिसी यांनी काढले आहेत.
सरकारची 25 सदस्यीय समिती लेपर्ड स्कीन आणि अन्य प्राण्यांच्या अवयवातून तयार होणाऱया उत्पादनांवर बंदी घालण्याचा विचारही करत आहे. यासंबंधी लवकरच निर्णय होऊ शकतो. ट्रॉफी हंटिंगवर नजर ठेवणाऱया संस्थेनुसार 2014-19 दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून 5 हजारांहून अधिक सिंहांच्या ट्रॉफी (अवयव) विदेशात पाठविण्यात आल्या आहेत.
जंगलांमध्ये 3500, शिकारीसाठी 12 हजार
आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिकेत सुमारे 7 हजार गेम्स फार्म्स आहेत. यात शिकारीसाठी प्राण्यांना तयार करण्यात येते. चकित करणारी बाब म्हणजे येथील जंगलांमध्ये केवळ 3,500 सिंह आहेत. तर 350 फार्म्समध्ये शिकारीसाठी तयार सिंहांची संख्या 12 हजारांहून अधिक आहे.









