प्रतिनिधी/ महाबळेश्वर
राज्यातील आघाडी सरकार हे उत्तम काम करीत आहे. कोणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार. भविष्यात जर आम्ही पुन्हा एकत्र निवडणुका लढण्याचा निर्णय जर घेतला तर पुढील पाच वर्षे देखिल राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील. जिल्हा बँकेच्या निकालाबाबत बोलताना ते पवार साहेब म्हणाले, शशिकांत शिंदे यांनी निवडणूक गांभिर्याने न घेतल्यानेच त्यांचा पराभव झाला, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.
महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या समारोपासाठी खा. शरद पवार हे महाबळेश्वर येथे आले होते. शिबिराला जाण्यापुर्वी त्यांनी येथील शासकिय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील व आ मकरंद पाटील हे उपस्थित होते. माजी मंत्री चंद्रकांत पाटील हे पंधरा दिवसात हे आघाडी सरकार पडणार अशी भविष्यवाणी करीत आहे त्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार हे बोलत होते. ते म्हणाले की, पाटील यांना आता काही काम उरले नाही त्यामुळे त्यांनी आता नविन भाकित व्यक्त करण्याचा नविन व्यवसाय सुरू केला असावा अशा शब्दात पाटील यांची शरद पवार यांनी खिल्ली उडविली.
सातारा जिल्हा बँकेची झालेली निवडणुकीत शिवसेनेला विश्वास न घेतल्याने शिवसेनेचे शंभुराज देसाई हे पराभुत झाले. आता पुढील काळात ते स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे याबाबत बोलताना खा. पवार म्हणाले की, जिल्हा बॅँकेची निवडणूक ही आघाडी करून लढविली नाही. सर्व उमेदवार हे स्वतंत्र उभे राहिले होते तर काही उमेदवार हे सहकार पॅनेलच्या वतीने निवडणूक लढवित होते. ही लोकशाही आहे प्रत्येकाला स्वायत्ता आहे त्यामुळे आलेला निकालही त्यांनी स्वीकारला पाहिजे. माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभिर्याने घ्यायला हवी होती. नवनिर्वाचित बँकेतील संचालकांनी आता भविष्यात राजकारणाचे जोडे बाहेर काढुन बॅँकेचा कारभार राजकारणविरहीत केला पाहिजे असेही ते म्हणाले.
महाबळेश्वर येथे शिबिराची जुनी परंपरा आहे. 52 वर्षांपुर्वी येथे झालेल्या शिबिरात माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक ही मंडळी आम्हाला प्रशिक्षण देत असत अशी आठवण सांगुन खा. शरद पवार म्हणाले की, राज्यात आघाडी सरकार आहे. आघाडी सरकार कसे चालते, राज्याची संस्कती, जडण घडण तसेच देशासमोर असलेले प्रश्न, राज्यासमोर असलेले प्रश्न हे नविन पिढीला समजले पाहिजे म्हणुन पक्षाच्या वतीने हे युवकांना प्रशिक्षण देणारे शिबिर घेण्यात आले आहे. राज्य सरकारमधील नव्या पिढीचे विचार पक्षातील तरूणांना ऐकायला मिळावे त्यांना प्रश्न विचारण्याची संधी तरूणांना मिळावी हाच या शिबिरामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.








