शाहूवाडी/प्रतिनिधी
शाहुवाडी तालुक्यात कोरोना संसर्गाचा पुन्हा एकदा प्रसार वाढला असून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत खुटाळवाडी गावातील बाधीत डॉक्टरच्या घरातील तीन महिलांसह एकूण नऊ लोकांचा कोरोना अहवाल पॉजीटीव्ह आल्याने तालुक्यात कोरोनाच्या समूह संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आलेल्या अहवालानुसार बांबवडे-खुटाळवाडी येथील बाधित डॉक्टरच्या घरातील तीन नातलग महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये डॉक्टरांची पत्नी, भावजय तसेच वीस वर्षीय पुतणीचा समावेश आहे. तसेच रात्री उशिरा आलेल्या अहवालात खुटाळवाडीतीलच आणखी सहाजण कोरोनाग्रस्त आले. यामध्ये बाधित डॉक्टरांचे भावबंध व मित्रांचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यात तीन दिवसात बाराजण कोरोना बाधीत आढळून आल्याने या रुग्णांची संख्या २०५ वर गेली आहे.
दरम्यान बांबवडे येथील बाधित डॉक्टरच्या संपर्कातील परिचारिका काल कोरोनाबाधित आढळल्यानंतर परिचरिकेच्या मलकापूर येथील घरातील आठजणांना आरोग्य प्रशासनाने कोविड केंद्रात अलगिकरण कक्षात दाखल केले आहे. या आठजणांसह एकूण सोळा नागरिकांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणीसाठी पाठवून दिले आहेत. बाधित खाजगी डॉक्टरच्या संपर्कातील सर्व ११० जणांचे स्वॅब अहवाल प्राप्त झालेत, यात बाराजण बाधित तर ९८ अहवाल निगेटिव्ह आलेत. बाधित आढळून आलेल्या लोकांची संपर्क साखळीचा शोध सुरू असून संबंधित नागरिकांनी निःसंकोचपणे पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बीडीओ अनिल वाघमारे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी केले आहे.