सईद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेत तामिळनाडू सलग दुसऱयांदा विजेते
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असताना एम. शाहरुख खानने खणखणीत षटकार खेचल्यानंतर तामिळनाडूने संघर्षपूर्ण अंतिम लढतीत कर्नाटकचा 4 गडी राखून धुव्वा उडवला आणि अतिशय थाटात सईद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेच्या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. तामिळनाडूने ही स्पर्धा जिंकण्याची इतिहासातील तिसरी वेळ ठरली. यापूर्वी 2006-07 व 2020-21 या हंगामात त्यांनी जेतेपद संपादन केले होते.
2019 मध्येही तामिळनाडूचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. पण, त्यावेळी कर्नाटकने त्यांचा धोबीपछाड केला होता. येथे सोमवारी संपादन केलेल्या विजयासह तामिळनाडूने कर्नाटकशी त्या पराभवाचा हिशेब देखील चुकता केला. सामनावीर मसूद शाहरुख खानने 15 चेंडूत 1 चौकार, 3 उत्तुंग षटकारांसह नाबाद 33 धावांची आतषबाजी केली.
अरुण जेटली स्टेडियमवर सोमवारी संपन्न झालेल्या अंतिम लढतीत कर्नाटकने 20 षटकात 7 बाद 151 धावांची मजल मारली तर प्रत्युत्तरात तामिळनाडूने 20 षटकात 6 बाद 153 धावांसह निसटता विजय संपादन केला.
विजयासाठी 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूकडून हरी निशांत व एन. जगदीशन यांनी 29 धावांची सलामी दिली. निशांत (23) चौथ्या षटकात धावचीत होत बाद झाला आणि त्यानंतर मैदानावर उतरलेल्या साई सुदर्शनने धावफलक सातत्याने हलता ठेवला. करुण नायरने सुदर्शनला (9) बाद करत कर्नाटकला हवाहवासा ब्रेकथ्रू मिळवून दिला. यावेळी तामिळनाडूची 7.4 षटकात 2 बाद 51 अशी स्थिती होती.
कर्नाटकच्या गोलंदाजांनी यानंतर काही षटके उत्तम टप्प्यावर, नियंत्रित मारा करत विजय शंकर (18) व जगदीशन (41) यांना बाद केले आणि तामिळनाडूसमोर 28 चेंडूत 57 धावा, असे आव्हानात्मक टार्गेट होते. मात्र, एम. शाहरुख खान मैदानावर उतरला आणि त्याच्या फटकेबाजीमुळे या लढतीचे चित्र पालटले.

शाहरुखने अवघ्या 15 चेंडूत 33 धावांची आतषबाजी केली आणि पाहता पाहता कर्नाटकचे वर्चस्व खालसा केले. डावातील शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना शाहरुखने प्रतीक जैनच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला आणि तामिळनाडूला जेतेपदावर शिक्कामोर्तब करुन दिले.
कर्नाटकची खराब सुरुवात
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर रोहन कदम (0), मनीष पांडे (13) व करुण नायर (18) हे तिघे अव्वल फलंदाज अतिशय स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्नाटची 3 बाद 32 अशी दाणादाण उडाली आणि यानंतर मोठय़ा धावसंख्येचे त्यांचे मनसुबे जवळपास धुळीस मिळाले.
शरथ बीआर (16) व मनोहर (37 चेंडूत 46) यांनी चौथ्या गडय़ासाठी 54 धावांची भागीदारी साकारत कर्नाटकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. डावाच्या उत्तरार्धात प्रवीण दुबेने 25 चेंडूत 33 धावांची जलद खेळी साकारली आणि यामुळे कर्नाटकने 7 बाद 151 धावांपर्यंत मजल मारली. तामिळनाडूतर्फे साई किशोरने 3 बळी घेतले.
धावफलक
कर्नाटक ः रोहन कदम त्रि. गो. साई किशोर 0 (2 चेंडू), मनीष पांडे त्रि. साई किशोर 13 (15 चेंडूत 2 चौकार), करुण नायर त्रि. गो. संजय यादव 18 (14 चेंडूत 2 चौकार), बीआर शरथ झे. साई सुदर्शन, गो. साई किशोर 16 (20 चेंडूत 1 चौकार), अभिनव मनोहर झे. मोहम्मद, गो. संदीप वॉरियर 46 (37 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), प्रवीण दुबे झे. बदली खेळाडू (एम. सिद्धार्थ), गो. नटराजन 33 (25 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), जगदीश सुचिथ धावचीत (मोहम्मद-नटराजन) 18 (7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), एमबी दर्शन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 7. एकूण 20 षटकात 7 बाद 151.
गडी बाद होण्याचा क्रम
1-9 (रोहन कदम, 1.1), 2-32 (करुण, 4.6), 3-32 (मनीष, 5.1), 4-87 (बीआर शरथ, 13.2), 5-108 (अभिनव मनोहर, 16.4), 6-149 (प्रवीण दुबे, 19.5), 7-151 (जगदीश सुचिथ 19.6).
गोलंदाजी
संदीप वॉरियर 4-0-34-1, रविश्रीनिवासन साई किशोर 4-0-12-3, संजय यादव 4-0-32-1, मुरुगन अश्विन 4-0-28-0, टी. नटराजन 4-0-44-1.
तामिळनाडू ः हरी निशांत धावचीत (विद्याधर-शरथ) 23 (12 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), नारायण जगदीशन झे. सुचिथ, गो. करिअप्पा 41 (46 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), साई सुदर्शन पायचीत गो. नायर 9 (12 चेंडू), विजय शंकर झे. सुचिथ, गो. करिअप्पा 18 (22 चेंडू), संजय यादव झे. मनोहर, गो. जैन 5 (5 चेंडूत 1 चौकार), शाहरुख खान नाबाद 33 (15 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), एम. मोहम्मद झे. पांडे, गो. विद्याधर 5 (5 चेंडू), रविश्रीनिवासन साई किशोर नाबाद 6 (3 चेंडूत 1 चौकार). अवांतर 13. एकूण 20 षटकात 6 बाद 153.
गडी बाद होण्याचा क्रम
1-29 (हरी, 3.5), 2-51 (सुदर्शन, 7.4), 3-95 (विजय शंकर, 15.1), 4-95 (जगदीशन, 15.2), 5-116 (संजय, 17.1), 6-130 (मोहम्मद, 18.5).
गोलंदाजी
जगदीश सुचिथ 4-0-33-0, केसी करिअप्पा 4-0-23-2, प्रतीक जैन 4-0-34-1, विद्याधर पाटील 3-0-21-1, एमबी दर्शन 3-0-30-0, करुण नायर 1-0-2-1, प्रवीण दुबे 1-0-4-0.









